ठाणे - निवडणुकीला अवघे चार दिवस शिल्लक असताना कल्याण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटील यांनी तगडे आव्हान दिले आहे. 'कधी नाही, ते सेनेचे उमेदवार सैरावैरा पळत असून माझ्या उमेदवारीमुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. मला मुंगी समजत असतील, तर हत्तीने घाबरायची गरज नाही', अशी टीका कल्याण लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवारावर केली.
कल्याण लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना समाजातील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला. याची माहिती देण्यासाठी कल्याण शिळफाटा रोडवरील कोकण किंग रिसोर्ट येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सेना उमेदवारावर टीका केली.
या पत्रकार परिषदेत आगरी कोळी भूमिपुत्र संघटना, कष्टकरी घर मालक कामगार संघटना, लाल बावटा रिक्षा युनियन, ठाणे जिल्हा ख्रिश्चन संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि दलित महासंघ अशा विविध संघटनांनी या वेळी आपला पाठिंबा बाबाजी पाटील यांना जाहीर केला.
कल्याण लोकसभा मतदार संघ श्रीकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटील यांच्यात चुरस निर्माण झाली आहे.