ठाणे - आजीबाईच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न डोंबिवलीतील मिलापनगर परिसरातील एका बंगल्याचा आवारात घडला आहे. याघटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून आजीबाई सुहासिनी परांजपे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
वयोवृद्ध पती पत्नी बागेत काम करीत असताना घडला प्रकार
सुहासिनी परांजपे (वय ८०) आणि त्यांचे पती शरदचंद्र परांजपे (वय ८५) हे आपल्या बंगल्याचा आवारात सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बागकाम करीत होते. त्यावेळी स्कूटरवरून आलेल्या एका व्यक्तीने काही वेळ त्यांचा बंगल्यासमोर टेहळणी केली. त्यानंतर बंगल्याच्या कंपाऊंडचे बंद गेट उघडून एका चोरट्याने आत प्रवेश केला आणि बागकाम करतानाच आजीबाईच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला या वृद्ध महिलेने विरोध केला असता त्या अनोखळी चोरट्याने त्यांना ढकलून देऊन पळ काढला.
आजीबाईंना कोरकोळ दुखापत
ही घटना पाहून वृद्ध महिलेच्या पतीने त्याचा पाठलागही केला. मात्र चोरटा बंगल्याबाहेर उभ्या केलेल्या त्याच्या दुचाकीवरून पसार झाला. मात्र चोरट्याने मंगळसूत्र खेचल्याने ते तुटले आहे. तर या घटनेत सुदैवाने आजीबाईला कोरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेचे चित्रीकरण बाजूचा बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस त्या चोरट्याचा शोध घेत आहेत.