नवी मुंबई - सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी-बिद्रे गोरे हत्याकांड प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर त्यांच्या कुटुंबीयांनी शंका व्यक्त केली होती. मात्र, आज अश्विनी यांचे भाऊ आनंद बिद्रे यांनी तपासाला वेग आला आहे, असे सांगितले. आनंद हे या प्रकरणी पनवेल कोर्टात हजर होते. यावेळी अश्विनी यांची कन्या व पतीही आज पनवेल कोर्टात उपस्थित होते.
हेही वाचा - काँग्रेसमध्ये मतभेद, सुशीलकुमार शिंदेंचा शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध
१५ एप्रिल २०१६ पासून अश्विनी बिद्रे- गोरे या नवी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या होत्या. त्या बेपत्ता झाल्या नसून, वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी बिद्रेंना बेपत्ता केल्याचा आरोप कुटुंबाने केला होता. या तपासात पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप सुरुवातीला अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला होता.
अश्विनी जयकुमार बिद्रे २००० सालापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. २००५ साली त्यांचा विवाह हातकणंगले गावातील राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि त्यांना पोलीस उपनिरीक्षक पद मिळाले होते.
हेही वाचा - शिवसेनेचा आघाडीसोबत जाण्याचा निर्णय बाळासाहेबांच्या भूमिकेशी प्रतारणा करणारा - रामदास आठवले
पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली येथे झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर २०१३ मध्ये अश्विनी यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला आल्या. येथेही अभय कुरुंदकर अश्विनीला भेटण्यासाठी वारंवार येत होता. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजले होते. त्यानंतर काही कालावधीनंतर अश्विनी बिद्रे-गोरे या बेपत्ता झाल्या व त्यांचा खून झाल्याचे अखेर उघड झाले.
अभय कुरुंदकर याचा बालपणीचा मित्र महेश फळशीकर याने अश्विनी यांच्या हत्येची कबुली दिली होती. धक्कादायक म्हणजे अश्विनी यांची हत्या करून लाकूड कापण्याच्या मशीनने मृतदेहाचे तुकडे करण्यात आले व हे तुकडे वसईच्या खाडीत फेकून देण्यात आल्याचे फळशीकरने सांगितले होते. पोलिसांकडून तपास योग्य होत नसल्याचा आरोप अश्विनी यांचे पती राजू गोरे व भाऊ आनंद बिद्रे यांनी केला होता. मात्र, आज पोलीस तपास योग्य दिशेने होत आहे व तपासाला वेग आला आहे, असे अश्विनी यांचे भाऊ आनंद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.