मुंबई - देशात आणि राज्यात कोरोना विरोधाची लढाई सुरू असताना सोशल मीडियावर मात्र राजकीय लढाई सुरु झाली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अनंत करमुसे या व्यक्तीला केलेल्या कथित मारहाणी प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनंत करमुसे याला समर्थन दिल्यानंतर आता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने देखील या प्रकरणात उडी घेतली आहे. तक्रारदार व्यक्ती हाच दोषी असून त्यावर गुन्हा दाखल करा, याबाबचतची तक्रार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या स्नेहल कांबळे यांनी मेलद्वारे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
हेही वाचा... 'मंत्री जितेंद्र आव्हाडांसमोर मला लाठ्या-काठ्यांनी बदडले', सोशल मीडियावरील पोस्ट न आवडल्याने मारहाण झाल्याचा आरोप
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची जाणीवपुर्वक बदनामी केली जात आहे. अनंत करमुसे आणि सुनील राजे पवार या दोघांनी जितेंद्र आव्हाड, त्यांची पत्नी आणि मुलगी यांच्याबद्दल समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर लिहिले आहेत. तसेच त्यांची पत्नी आणि मुलगी यांच्यावर बलात्कार करू, अशी धमकी दिली आहे. त्यामुळे त्याच्यावरच गुन्हा दाखल करा, अशी तक्रार करणारा मेल स्नेहल कांबळे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना केला आहे. सायबर क्राईम आणि भारतीय दंडसंहितेखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी विनंती राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून स्नेहल कांबळे यांनी केली आहे.
हेही वाचा... आव्हाडांच्या बंगल्यावर मारहाण झालेल्या अभियंत्याच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून हस्तगत