ठाणे - सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती अधिकारात दाखल केलेल्या अर्जांना उत्तरे देताना पालिका अधिकारी कायम टाळाटाळ करत असतात. यामधील एका घटनेत माहितीच्या अधिकारात विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर तब्बल सव्वा वर्षानंतर दिल्याचे मनसे शाखा अध्यक्ष संतोष निकम यांच्या पाठपुराव्याने समोर आले आहे.
तसेच या माहितीत जनमाहिती अधिकारी संदीप सावंत यांनी टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उचलला आहे. अर्जांच्या उत्तराला अनिश्चित वेळेत उत्तर दिल्याने 11 पैकी 9 अपील अर्जांवर कारवाई करण्याचा इशारा जनमाहिती अधिकाऱ्यांनी दिला आहे. संबंधित याचिका महानगर पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग वर्तकनगर प्रभाग समितीचे प्रभाग अधीक्षक व शहर विकास विभागात दाखल करण्यात आल्या होत्या.
हेही वाचा आता सरन्यायाधीशांचे कार्यालय माहिती अधिकाराच्या कक्षेत
ठाणे महानगर पालिकेच्या अखत्यारीत सुरू असलेल्या बी.एस.यु.पी. संदर्भात माहिती मागवण्यात आली होती. ही माहिती दिशाभूल करणारी असून तब्बल सव्वा वर्षांनंतर दिल्याने अधिकारी मोहन कलाल यांच्याविरुद्ध सामन्य प्रशासन विभाग,मंत्रालयाचे शासन परिपत्रक क.के.मा. अर्ज -२००७/७४/प्र.क्र..१५४/०७/०६- दिनांक ३१/०३/२००८ नुसार शिस्तभंगाची कारवाई का करू नये असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत लेखी खुलासा देणे आवश्यक असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा माहितीचा अधिकारच सर्वोच्च!
माहितीच्या अधिकारात येणाऱ्या अपील अर्जांमध्ये बी.एस.यु.पी विभागाचे 4 अपील अर्ज, सार्वजनिक बांधकाम खाते वर्तकनगर प्रभाग समितीचे 3 अपील अर्ज, वर्तकनगर प्रभाग समिती कर विभागाचा 1 अपील अर्ज, वर्तकनगर प्रभाग समिती कर अधीक्षक 1 अपील अर्ज तसेच शहर विकास विभाग 1 अपील अर्ज असे 11 अर्ज दाखल करण्यात आले. मात्र त्याची उत्तरे दिशाभूल करणारी होती. तसेच या प्रक्रियेत कालावधीचे उल्लंघन केल्याने तत्कालीन जनमाहिती अधिकाऱ्यांनी 11 पैकी 9 अपील अर्जांवर संबंधितांना सुनावणी शास्तीपत्र आणि शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच याचा लेखी खुलासा मागवण्यात आला आहे.
विविध विषयांवर दाखल करण्यात आलेल्या 11 माहितीच्या अपिलार्थी अर्जांमध्ये ठराविक कालावधीत उत्तर न देणाऱ्या मोहन कलाल आणि संदीप सावंत यांच्यावर हा बडगा उचलण्यात आला आहे. तर ओसवाल रास्ता प्रकरणी अपील अर्जात ठा.म.पा. शहर विकास विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेंद्र बेंडाळे आणि उपअभियंता अतुल भोळे, वर्तकनगर प्रभाग समिती साहाय्यक आयुक्त चारुशीला पंडित आणि कर विभाग अधीक्षक प्रभाकर शिंदे यांनी सत्यम शिवम सुंदरम इमारतीबद्दल मागवण्यात आलेली माहिती उशिरा दिल्याने कोकण खंडपीठ आयुक्तानी यांवर शास्ती व शिस्तभंगाचा कारवाई का करू नये, याचा खुलासा निर्धारित वेळेत सादर करण्याचा आदेश दिला. याबाबत माहिती संतोष निकम यांनी माहितीच्या अधिकारात समोर आणली आहे.