नवी मुंबई - मुलांना मुलींशी आदराने वागण्याची शिकवण देणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडले आहे. वाशीमधील सिडको एग्झीबीशन सेंटरमध्ये ते एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी हिंगणघाटमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध केला.
हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील पीडितेचा आज मृत्यू झाल्याने राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध ठिकाणी याविरोधात मोर्चे निघत असून सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी खेद व्यक्त केला आहे.
शाळेतही मुला-मुलींना याबाबत शिक्षण देणे गरजेचे असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच 'गुड टच' आणि 'बॅड टच' काय असतो याची जाणीव करून देणे फार महत्वाचे आहे, असे मत त्यांनी मांडले. यासाठी शालेय अभ्यासक्रमात नैतिक शिक्षणाचा समावेश करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.