ठाणे - शिवसेनेच्या राज्यभर सुरू असलेल्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे मंगळवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. शिवसेनेला पहिली सत्ता याच शहराने दिली असून, यंदाच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये सेनेला ठाणेकरांनीच एकहाती कौल दिल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. त्यामुळे आता 'ठाणे पॅटर्न'ने महाराष्ट्रात भगवे सरकार अणण्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
तसेच शहरातील खड्ड्यांसंबंधी प्रश्न विचारल्यावर,'खड्डे केवळ ठाण्यात नसून', राज्यभरातील सर्वच रस्त्यांवर असल्याचे त्यांनी सांगितले. आता टेंडर सिस्टीम बदलण्यासह ठेकेदारांकडून रस्त्याची हमी सरकारने घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पालघर येथील जनाशीर्वाद यात्रेनंतर आदित्य ठाकरे शंभराव्या विधानसभा मतदारसंघात होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातही आपल्याला सेंच्युरी मारायची असल्याचा आशावाद व्यक्त केला. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सर्वाधिक आमदार सेनेचे असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंत्रालयावर भगवा फडकवण्याचा निर्धार केला. महाराष्ट्राच्या स्वप्नासाठी ही यात्रा काढली असून, शिवसेनेने मंत्रालय जनतेपर्यंत आणण्याची मनीषा बाळगली असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सर्वांनी जातीभेद व धर्माची बंधने झुगारून नवा महाराष्ट्र घडवायला हवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.