ठाणे - आमदार आणि खासदारांच्या वाहनांवर अशोकस्तंभाचे स्टिकर लावल्याचे अनेकदा पाहावयास मिळतात. मात्र, असे स्टिकर लावणे हे बेकायदेशीर असून यापुढे थेट आमदार आणि खासदारांवरसुद्धा कारवाई केली जाणार. याबाबतचे वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातल्या सर्व पोलीस आयुक्तांना आदेश दिले आहेत. त्यामुळे, या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजाणी होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
..यांना आहेत वाहनांवर अशोकस्तंभ लावण्याचे अधिकार
आमदार आणि खासदारांच्या वाहनांवर अशोकस्तंभ आणि त्याखाली आमदार, खासदार असे लिहिलेले स्टिकर अनेकदा पाहायला मिळतात. मात्र, असे स्टिकर्स लावण्याचा अधिकार आमदार आणि खासदारांना नसून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उल्हासनगरचे समाजसेवक राम वाधवा यांनी केली होती. वाहनांवर अशोकस्तंभ लावण्याचे अधिकार हे केवळ पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, लोकसभेचे सभापती आणि उपसभापती, राज्य सभेचे उपसभापती, चीफ जस्टीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांना असतात. तर, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश, राज्यातले मंत्री, विधानसभा आणि विधानपरिषदेचे सभापती, उपसभापती हे त्यांच्या राज्यात अशोकस्तंभ वाहनांवर लावू शकतात.
राष्ट्रीय चिन्हाचा अपमान म्हणून तक्रार
हल्ली सर्रासपणे खासदार, आमदार यांच्या वाहनांवर अशोकस्तंभ लावले जात असल्याने या राष्ट्रीय चिन्हाचा अपमान होत असल्याची तक्रार उल्हासनगरचे समाजसेवक राम वाधवा यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत अधिकार नसलेले कुणीही राष्ट्रीय चिन्ह वापरू नये आणि वापरत असल्यास कारवाई करण्यात यावी, असे आदेश वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी राज्यभरातल्या पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत.
हेही वाचा - Thane Knife Attack : भररस्त्यावर दोघांवर जीवघेणा चाकू हल्ला; हल्लेखोराला पोलिसांनी शिताफीने पकडले