ठाणे - नववर्षाचे स्वागत करताना मद्य प्राशन करून वाहन चालविण्याचे प्रकार रोखण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दित ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. त्यात ४१६ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱया २०७ सह प्रवाशांवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात २५ डिसेंबरपासून मोहीम सुरू केली आहे. २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत झालेल्या कारवाईत एकूण ९२६ मद्यपी वाहनचालक पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. तर, त्यांच्यासोबत प्रवास करणाऱया ४५१ जणांनाही कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागला आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदीचे आदेश दिले असले तरी नवीन वर्षांच्या स्वागतासाठी अनेक जण घराबाहेर पडण्याची शक्यता होती. मद्य प्राशन करून वाहन चालविल्याने अपघातांचे प्रमाणही वाढण्याची भीती होती. या संभाव्य दुर्घटना रोखण्यासाठी ३१ तारखेला आयुक्तालयाच्या हद्दित ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. त्यात प्रत्येक वाहन चालकांची कसून चौकशी करण्यात आली. संशयास्पद वाहनचालकांची ब्रेथ अँनालायझर्सच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली. वाहन चालकाने मद्य प्राशन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ही तपासणी करताना कोरोना संक्रमण होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली.
सम्पूर्ण ठाण्यात कारवाई -
ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर या शहरांमध्ये झालेल्या या कारवाईत ४१६ मद्यपी वाहनचालक पोलिसांना सापडले आहेत. या वाहनचालकांसोबत प्रवास करणाऱयांना मोटर वाहन कायद्याच्या कलम १८८ अन्वये दोषी ठरवून त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करता येते. त्यानुसार २०७ सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. नारपोली शाखेच्या हद्दित सर्वाधिक ६७ वाहनचालक आणि ४० सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याखालोखाल कोणगाव, डोंबिवली, उल्हासनगर या विभागांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी मद्यपी वाहनचालक राबोडी, ठाणे नगर आणि कोपरी या विभागात आढळले आहेत.