ठाणे - एका गर्भवती महिलेला तब्बल दहा तास शासकीय रुग्णालयाच्या पायरीवर ताटकळत ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. रोहिणी मारुती मुकणे ( वय २८ वर्षे ) असे गरोदर असलेल्या आदिवासी महिलेचे नाव आहे.
हेही वाचा - चांदणी डान्स बारवर गुन्हे अन्वेषण विभागाकडून छापा; १७ बारबालांसह ४० जण ताब्यात
महिलेस प्रसुती वेदना होत असल्याने ती प्रसुतीसाठी शनिवारी दुपारी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पतीसोबत दुपारी एक वाजता आली होती. यावेळी तपासण्या आणि रक्त घेऊन येत नाही तोपर्यंत दाखल करून घेणार नाही, असे कारण देत या रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या ठिकाणी आलेल्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी या महिलेची विचारपूस केल्यावर हा प्रकार समोर आला. दरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय गाठत महिलेस उपचरासाठी दाखल करून घेतले. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू केले असून महिलेच्या शरीरात रक्त कमी असल्याने रविवारी नातेवाईकांनी बाहेरून रक्त उपलब्ध करून दिले असून त्यानंतर तिची प्रसूती केली जाणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
हेही वाचा - रेल्वे सुरक्षा यंत्रणा सदृढ करण्याची गरज; महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाची मागणी