ठाणे : (Thane) नाशिकहुन ठाण्याच्या दिशेने कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात टेम्पोमधील (accidental death of 400 chickens) ४०० कोंबड्या जागीच ठार झाल्या आहेत. हि घटना मुंबई - नाशिक महामार्गवरील (Mumbai Nashik highway) पडघा टोल नाक्या नजीक असलेल्या पेट्रोल पंप समोर घडली आहे. सुदैवाने टेम्पो चालकासह टेम्पो मध्ये प्रवास करणाऱ्या दोघांना करकोळ दुखापत झाली आहे. मात्र ४०० कोंबड्याचा मृत्यू झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदरचा टेम्पो हा ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरातील, अजीज चिकन सेंटरच्या मालकाचा असून त्यांचा कोंबड्या-मटण विक्रीचा घाऊक व्यवसाय आहे. रोजच्या प्रमाणे नाशिकहुन त्यांच्या बोलेरे कंपनीच्या टेम्पोमध्ये एका पोल्ट्री फार्ममधून ८४० कोंबड्याची वाहतूक टेम्पो चालक करीत होता. त्याचवेळी आज पहाटे सहाच्या सुमारास मुंबई - नाशिक महामार्गवरील पडघा टोल नाक्या नजीक असलेल्या, पेट्रोल पंपा समोर येताच एक कंटेनर अचानक समोर आल्याने, भरधाव टेम्पो चालकाने ब्रेक दाबताच टेम्पो काही क्षणातच महामार्गवर उलटला. या अपघातात सुमारे ४०० कोंबड्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. अपघात होताच स्थानिकांनी अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू केले व क्रेनच्या साहाय्याने टेम्पो महामार्गावरून हटविण्यात आला. तर पलटी झालेल्या टेम्पोमधून चालकासह दोघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अजीज चिकन सेंटरच्या मालकाने मृत्यू पावलेल्या कोंबड्यांचा खच बाजूला केला व जिवंत कोंबड्या दुसऱ्या टेम्पोमध्ये भरुन ठाण्यात पोहचवल्या.
दरम्यान, मुंबई - नाशिक महामार्गवर बहुतांश ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. याही खड्यामुळे अनेक लहान मोठे अपघात घडतच आहे. मात्र महामार्गावरील खड्डे न बुजवताच पडघा टोल नाक्यावर वाहन चालकांकडून टोल वसुली केली जात असल्याने, त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या अपघाताची नोंद पडघा पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.