ठाणे - सोने-चांदी विक्रीच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी व्यापाऱ्यांची नजर चुकवून दोन मिनिटातच दोन लाख रुपयांचे दागिने हात चालाखीने लंपास केल्याची घटना घडली आहे. तर या चोरट्या महिलांची हातचालाखी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी दुकान मालकाने अज्ञात बुरखाधारी महिलांविरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आता पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या चोरट्या महिलांचा शोध घेत आहे.
दोन सोन्याच्या बांगड्या दोन मिनिटात लांबविल्या
भिवंडी शहरातील मुख्य बाजारपेठेत कमलेश भवरलाल जैन यांच्या मालकीचे सरगम ज्वेलर्स नावाचे सोनेचांदी विक्रीचे दुकान आहे. या दुकानात २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास दोन बुरखाधारी महिला सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या होत्या. दुकानात शिरताच वेगवेगळे दागिने पाहण्यासाठी दुकानातील कामगारांकडे मागत असतानाच कामगारांची नजर चुकवून समोर ठेवलेल्या दोन सोन्याच्या बांगड्या या चोरट्या महिलांनी हातचालाखीने स्वतः जवळ लपवून खरेदी न करताच निघून गेल्या होत्या.
दोन दिवसांनी दागिने चोरीला गेल्याचे आले समोर
दुकान मालक कमलेश भवरलाल जैन दोन दिवसांनी दुकानातील किती दागिनेच्या विक्री आणि शिल्लक किती राहिले. याची गिनती करीत असताना यांच्या दोन दिवसांनंतर ४२ ग्रामच्या २ बांगड्या कमी असल्याचे निर्दशनास आले. त्यानंतर काल त्यांनी निजामपूरा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात बुरखाधारी महिलांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या दोन चोरट्या महिलांचा शोध सुरू केला आहे.