ठाणे - आयुष्यभर शिवसेना पक्षाची एक निष्ठ राहिलेल्या ६४ वर्षीय शिवसैनिक गंभीर आजाराने ग्रस्त होते. त्यांना उपचारासाठी स्वतःचे घर विकावे लागले. आता पदराचा पैसा संपल्याने कुटूंब हलाखीत जीवन जगत आहे. त्यामुळे शिवसैनिकाच्या मुलीने शिवसेना नेत्यांकडे वडिलांच्या उपचारासाठी याचना करीत असल्याची बातमी 'ई टीव्ही भारत'ने प्रसारित केली होती. नंदकुमार सांवत असे त्यांचे नाव आहे.
शिवसेना उपजिल्हा प्रमुखांनी केली मदत जाहीर
'ई टीव्ही भारत'च्या बातमीनंतर ठाणे ग्रामीण शिवसेना उपजिल्हा प्रमुख विश्वास थळे यांनी सावंत कुटुंबाकडे धाव घेतली. त्यांनी परिस्थिती जाणून घेतली. नंदकुमार सावंत यांच्या उपचाराला येणार खर्च पालकमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. तर शिवसेना वैद्यकीय सेवा विभागातील डॉक्टरांचे पथक नंदकुमार सांवत यांच्या घरी जाऊन उपचाराबाबत माहिती घेणार आहेत.
'ई टीव्ही भारत'ला पालकमंत्री शिंदेच्या कार्यालयातून फोन
नंदकुमार सावंत यांची व्यथा 'ई टीव्ही भारत'चे प्रतिनिधी सिद्धार्थ कांबळे यांनी प्रसारित केली. त्यानंतर नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून फोन आला.
स्वर्गीय बाळासाहेबांवरील श्रद्धा कायम
शिवसेनेत ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण हाच ध्यास नंदकुमार यांनी मनात ठेवला होता. नंदकुमार मूळचे रत्नागिरी जिल्ह्याचे रहिवाशी असून ते मुंबईतील करीरोड परिसरातच लहानाचे मोठे झाले. तर गोदरेज कंपनीत कार्यरत होते. मात्र कालातंराने मुंबई सोडून त्यांनी ठाण्यातील किसननगर भागात स्वतःचे घर घेऊन राहत होते. मात्र उपचारासाठी त्यांना राहते घर विकावे लागले आहे. विशेष म्हणजे ऐन कोरोना काळात सांवत कुटूंब भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात असलेल्या पद्मावती कॉम्प्लेक्समध्ये पाच नंबर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहण्यास आले. आता मात्र उपचार आणि घर खर्च चालविणासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांची मुलगी श्रेया ही एका खाजगी कंपनीत काम करत आहे. या मदतीसाठी सावंत कुटुंबाने ई टीव्ही भारत व शिवसेना नेत्यांचे आभार मानले.
हेही वाचा - गृहमंत्र्यांच्या घरी बाप्पाचे आगमन; गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करा - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील