ठाणे - कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील पश्चिमेकडील शास्त्रीनगर रुग्णालयात वॉर्डबॉयने रुग्णाच्या नातेवाईकाला शिवीगाळ केल्याची घटना रुग्णालयातील इमर्जनसी वॉर्डमध्ये घडली.
हेही वाचा - VIDEO VIRAL : मंत्रालयीन अधिकाऱ्याला महिलांनी चोपले; महिलेशी अश्लील संभाषण केल्याचा आरोप
वॉर्डबॉय दारू पिऊन इमर्जन्सी वॉर्डमध्ये झोपला असताना त्याला उठवल्याने त्याने शिवीगाळ केल्याचा आरोप रुग्णाचे नातेवाईक तथा रिपब्लिकन सेनेचे कल्याण - डोंबिवली जिल्हा अध्यक्ष आनंद नवसागरे यांनी केला आहे. आज मात्र या प्रकरणातील व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला आहे.
वडिलांच्या छातीत दुखत असल्याने शुक्रवारी त्यांना मी शास्त्रीनगर रुग्णालयात घेऊन गेलो. रुग्णालयाच्या तळमजल्यावर इमर्जन्सी वॉर्डमध्ये गेले असता तिथे बेडवर एक वॉर्डबॉय झोपला होता. वडिलांवर लवकर उपचार सुरू होणे आवश्यक असल्याने मी झोपलेल्या वॉर्डबॉयला उठवले, मात्र वॉर्डबॉयने माझ्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. बाजूकडील एका खोलीत नर्स देखील आराम करत होती. वॉर्डबॉय हा मोठ्या आवाजात वाद घालत असल्याचे ऐकून डॉक्टर इमर्जन्सी वॉर्डमध्ये धावते आले. दारूच्या नशेत तराट असलेल्या वॉर्डबॉयने मला शिवीगाळ केली, असा आरोप नवसागरे यांनी केला आहे. हा सर्व प्रकार नवसागरे यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.
वॉर्डबॉयला तात्काळ सेवेतून काढून टाकण्याची मागणी
महापालिकेच्या रुग्णालयात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या वॉर्डबॉयला कोविड काळात तात्पुर्त्या सेवेसाठी पालिका प्रशासनाने कामावर रुजू केले होते. मात्र, मस्ती चढलेल्या या वॉर्डबॉयने ड्युटीवर असताना दारू पिऊन मला शिवीगाळ केल्याने त्यास तात्काळ सेवेतून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी नवसागरे यांनी केली.
हेही वाचा - वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या लॉजवर पोलिसांचा छापा; ५ बळीत महिलांची सुटका