ठाणे - एका बिबट्याच्या बछड्याचे डोके प्लास्टिकच्या पाण्याच्या जारमध्ये अडकल्याची घटना रविवारी समोर आली होती. त्यानंतर गोरेगाव गावातील रहिवाशांनी बिबट्याची माहिती वनविभागाला दिली असता वन पथक व पॉज या प्राणी मित्र संस्थेच्या मदतीने त्या बिबट्याच्या ३ दिवसांच्या शोध मोहिमेला यश आले. बिबट्याच्या डोक्यात अडकलेला जार काढून त्याला जीवदान दिले.
हेही वाचा - Valentine Day With animals : ठाण्यातील तरुणाईने साजरा केला प्राण्यांसोबत अनोखा व्हॅलेंटाईन डे
तीन दिवसांपासून सुरू होती शोध मोहीम
वन विभागाच्या माहितीनुसार, बिबट्याचे हे बछडे अवघ्या एक वर्षाचे असल्याचा अंदाज आहे. बदलापूर – कर्जत मार्गावरील गोरेगाव भागात 3 दिवसांपूर्वी ते रात्री पाणी पिण्यासाठी आले असेल. मात्र, यावेळी एका पाण्याच्या जारमध्ये त्याचे डोके अडकले. त्यामुळे, डोक्यात जार घेऊन ते फिरत होते. त्यातच कारमधून प्रवास करताना प्रवाशांना हा बिबट्या दिसताच त्यांनी मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण केले. यानंतर या व्हिडिओच्या आधारे या बिबट्याचा परवा रात्रीपासून कसून शोध घेण्यात आला. अखेर ३ दिवसांच्या शोध मोहिमेनंतर बदलापूर जवळील गोरेगाव येथील जंगल भागातून त्याला पकडण्यात आले.
घटनास्थळीच बिबट्यावर उपचार
वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पॉज प्राणीमित्र संघटनेचे भूषण पवार, निलेश भणगे, नवीन साळवे, ऋश्रीकेश सुरसे, देवेंद्र निखले या सर्वांनी बिबट्याच्या डोक्याला अडकलेले प्लास्टिक जार कापून त्याची सुखरूप सुटका केली. विशेष म्हणजे, परवा रात्रीपासून या बिबट्याच्या डोक्यात जार अडकल्याने तो उपाशी आणि तहानलेला होता. त्यामुळे, त्याच्यावर घटनास्थळी जंगलातच उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानात नेणार असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा - Dhaba owner beaten incident in CCTV : भिवंडीत जेवणाच्या बिलावरून ढाबा चालकाला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद