ठाणे - मुरबाड शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून अज्ञात चोरट्याने सुमारे ४६ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी कसोशीने तपास सुरू केला आहे.
एटीएममधून रात्रीच्या सुमाराला रोकड लंपास
मुरबाड-कल्याण महामार्गावरील सोनारपाडा येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. बँके जवळच स्टेट बँकेचे एटीएम असून या एटीएममधून काल रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ४६ लाख रुपये लंपास केले. आज सकाळच्या सुमारास बँकेतील अधिकाऱ्याला चोरीचा प्रकार कळताच त्यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर चोरीचा प्रकार एटीमएममधील सीसीटीव्हीत कैद झाला असून या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा तपास सुरू केल्याची माहिती सूत्राने दिली आहे.
वाढत्या चोऱ्या, घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीती
मुरबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायांना ऊत आल्याने या संदर्भात अनेकवेळा स्थानिक जागृत नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र स्थानिक पोलीस या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करताना दिसत आहे. दुसरीकडे शहरासह ग्रामीण भागातही चोऱ्या, घरफोड्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच काल रात्रीच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याने पोलिसांच्या दिवस-रात्रीच्या गस्तीवर नागरिकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.