ठाणे - कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ३ कोटींच्या खंडणी प्रकरणात तिसऱ्या आरोपीची शनिवारी भर पडली आहे. परवीन तारीख या आरोपीचा ठाणे पोलिसांनी तळोजा कारागृहातून ताबा घेऊन त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
३ कोटींच्या खंडणी प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात केतन तन्ना, रियाज भाटिया आणि बुकी सोनू यांनी तक्रार दाखल केली आहे. या खंडणी प्रकरणात मुंबईचे आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह तब्बल २८ जणांवर कोपरी पोलीस ठाण्यात कलम गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी कोपरी पोलिसांनी ७ ऑगस्ट रोजी संजय पुनमीया आणि सुनील जैन या दोघांना अटक केली होती.
हेही वाचा-....आता कोथळा काढायची भाषा केली जाते; शरद पवारांनी नेत्यांची केली कानउघडणी
आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी
केतन तन्ना, रियाज भाटिया आणि बुकी सोनू जालना यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात कोपरी पोलिसांनी तिसऱ्या आरोपीचा कारागृहातून ताबा घेतला आहे. ताबा घेतलेल्या आरोपीचे नाव परवीन तारिक असे आहे. तो पूर्वीच मुंबईच्या २०२० मधील खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत अटकेत होता. कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या प्रकरणात त्याचा सहभाग आढळला आहे. कोपरी पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करीत तळोजा कारागृहातून १७ सप्टेंबर रोजी त्याचा ताबा घेतला. त्यानंतर त्याला १८ सप्टेंबर रोजी ठाणे न्यायालयात नेले. त्याला २२ सप्टेंबरपर्यंत म्हणजेच चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे.
परवीन तारिक आहे दाऊदचा निकटवर्तीय
परवीन तारिक हा कुप्रसिद्ध खंडणीखोर असून त्याच्यावर खंडणी मागणी, धमकावणे, जबरी चोरीसारख्या अनेक गुन्ह्याची नोंद आहे. तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा निकटवर्तीय आहे. सध्या परवीन तारिक हा नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात मुंबईतील खंडणी प्रकरणी न्यायालयीन कोठडीत बंदिस्त होता. दरम्यान कोपरी पोलीस ठाण्यात दाखल २८ जणांवरील ३ कोटी खंडणी प्रकरणात त्याचा सहभाग आढळला. त्याने धीरज शर्मा नावाच्या साक्षीदाराकडून प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथीमिरे यांच्या सांगण्यावरून ५० लाखाची खंडणी मागितली. ती २० लाखावर निश्चित झाली. ती रक्कम घेऊन प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथीमिरे यांना दिल्याचा आरोप करण्यात आल्याने तारिक याचा ताबा घेण्यात आला. परवीन तारिक याच्यावर यापूर्वीच गंभीर १० गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती वकील सागर कदम यांनी दिली.
हेही वाचा-'ज्यांना पतंग उडवायची, त्यांनी उडवावी'! अखेर संजय राऊतांनी चर्चेला दिला पूर्णविराम
ठाण्यातील खंडणी प्रकरण लांबले-
ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात दाखल खंडणी प्रकरण हे वानरांची शेपटी झाल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वीच माजी पोलीस आयुक्त, प्रदीप शर्मा यांच्यासह तब्बल २८ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांच्या साक्षीदाराला ५० लाखाची खंडणी मागितल्याचे प्रकरण तपासात समोर आले. यात खंडणी मागणारा परवीन तारिक याचा कोपरी पोलीस पथकाने ताबा घेतला आहे. त्याला २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणातील वकील सागर कदम यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात तपासात निष्पन्न होणाऱ्या आरोपींची संख्या वाढत जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे खंडणीची अनेक प्रकरणे उघडकीस येणार आहेत. खंडणी गुन्हे दाखल करणारे तक्रारदार हे खंडणी प्रकरणीच मुंबईत दाखल गुन्ह्यात आरोपी ठरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.