ठाणे - कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेकांना कोरोनाची लागण झाली तर लाखो लोकांनी जीव गमावले आहेत. दुसरी लाट आधीच्या तुलनेत जास्त भयंकर असून वृद्धांसह तरुणांनाही कोरोनाने विळख्यात घेतलंय. कोरोनाने मृतांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. नुकतंच ठाण्यात एका १०२ वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. 'तुम्ही नीट उपचार घ्या, कोरोनाशी दोन हात करा, तुम्ही कोरोनावर नक्की मात कराल,' असा कानमंत्र या आजीबाईंनी सर्वांना दिला आहे.
ठाण्यातील होरायझन प्राईम या हॉस्पिटलमध्ये गेली पंधरा दिवस उपचार घेऊन सुशीला पाठक नावाच्या एकशे दोन वर्षांच्या आजींनी करोनावर मात केली आहे. अतिशय खंबीरपणे आजींनी करोनाचा सामना केला आणि त्यांनी कोरोनावर मात केली. कोरोनाची लागण झाल्यामुळे आजींचे नेमके पुढे काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आजींचे दोन्ही नातू डॉक्टर सुजित बोपर्डेकर आणि डॉक्टर अभिजीत बोपर्डेकर यांनी आजीची जगण्याची शक्ती ओळखली आणि आजी करोनावर सहज मात करतील हे दोघांच्या लक्षात आले. त्यानंतर आजींवर उपचार सुरू करण्यात आले. परिणामी पंधरा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर होरायझन प्राईम या कोविड सेंटरमधील डॉक्टरांनी आजींना कोरोनापासून मुक्त केले. एवढेच नाही तर उपचारादरम्यान देखील आजी डॉक्टर सांगत असलेल्या सर्व गोष्टी करत असल्याने त्या लवकर बऱ्या झाल्या. आजींनी सकारात्मक विचार डोक्यात ठेवला आणि कोरोनावर मात करून घरी परतल्या.
इच्छाशक्ती आणि डॉक्टरांची मदत महत्वाची -
डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे आजी बचावल्या. मात्र, यात त्यांनी ठेवलेला सकारात्मक दृष्टिकोन जास्त महत्वाचा होता. त्यांच्या सकारात्मक मानसिकतेमुळे आजींनी सर्व उपचारांना प्रतिसाद दिला, त्यांनी आम्हालाही सकारात्मकतेचा धडा दिला, असे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. केक कापून अभिनंदन करून डॉक्टरांनी आजीला घरी पाठवले.
हेही वाचा - आंध्रच्या कलाकारांची कमाल! भंगारातून बनवली आकर्षक जीप; पाहा व्हिडिओ..