सोलापूर - सोलापूर शहरात एका अवैध व्यावसायिकाने स्टिंग ऑपरेशन करून सोलापूर शहर पोलिसांची पोलखोल केली आहे. अवैध व्यवसाय करायचे असेल तर महिन्याला दोन लाख रुपये हप्ता द्यावा लागेल, असा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
सोलापूर शहर गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी अजय पाडवी यांच्यासोबत एका जुगार क्लब चालकाने केलेला संवाद रेकॉर्ड झाला आहे. याबाबत संबंधित जुगार चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. पण, हा विभाग देखील वसुली करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा धक्कादायक आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांनी केला आहे. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी या व्हिडिओची गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरू केली आहे आणि संबंधित पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
छावा संघटनेच्या नेत्याने केली तक्रार -
छावा संघटनेचे नेते व माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओची शहानिशा करून, मुख्यमंत्री, गृहसचिव, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, अँटी करप्शनचे महासंचालक यांकडे ईमेलद्वारे तक्रार केली आहे. सोलापूर शहर गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पीएसआय संदीप उर्फ सनी शिंदे, अजय पाडवी, अँटी करप्शनचे उपअधीक्षक संजीव पाटील यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्या नावाचं उल्लेख -
सोलापुरात अवैध व्यवसाय सुरू करायचा असल्यास पोलिसांकडून परवानगी घ्यावी, अशी चर्चा सोलापुरातील अनेक जण करत होते. तसाच प्रकार उघडकीस आला असून, भंडाले या अवैध धंदेवाल्याने स्टिंग ऑपरेशन करून पोलिसांचे पितळ उघड केले आहे. सात रस्ता परिसरात गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचारी अजय पाडवी याला बोलावून 30 ते 50 हजार रुपये हप्ता देतो, असे सांगितले. पण त्याला नकार देत, 2 लाख रुपये द्यावेच लागतील, असे व्हिडिओ मध्ये दोघांचे संभाषण कैद झाले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्या नावाचा देखील उल्लेख या व्हिडिओमध्ये आहे.
अँटी करप्शन विभागाकडे व्हिडिओ क्लिप 15 दिवसांपूर्वी दिली तरी कारवाई नाही -
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली व्हिडिओ क्लिप अवैध व्यावसायिक भंडाले याने अँटी करप्शन सोलापूर आणि पुणे येथे दाखल केली आहे. जवळपास पंधरा दिवसांपूर्वी या व्हिडिओ बाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. अँटी करप्शन विभाग सोलापूर शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेला सतर्क करण्याचे कार्य करत असल्याचा आरोप करत ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली, असा आरोप अँटी करप्शन विभागावर करण्यात आला आहे.
अँटी करप्शन अधिकाऱ्याने आरोप फेटाळून लावले -
कोणत्याही प्रकारची सापळा कारवाईची माहिती आमच्याकडून बाहेर पडणे अशक्य आहे. सोलापूर शहर गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे आणि पोलीस कर्मचारी अजय पाडवी यांच्यावर होणारी कारवाई आमच्याकडून माहिती झाली हे आरोप करणाऱ्यांनी सिद्ध करून दाखवावे, असे अँटी करप्शन ब्युरोचे उपअधीक्षक संजीव पाटील यांनी आरोप करणाऱ्यांना आवाहन केले आहे. तसेच, संदीप शिंदे सोबत आमचे घनिष्ट संबंध आहेत याबाबत देखील सिद्ध करून दाखवावे, असे उपअधीक्षक संजीव पाटील यांनी सांगितले आहे.
पोलीस आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले -
सोलापूर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर तर कारवाई होणारच, तसेच पडद्यामागील सुत्रधारावर देखील कारवाई करू, असे आश्वासन दिले आहे. तसेच पोलीस आयुक्तालय जनसंपर्क विभागाने 22 मार्च रोजी आदेश पारित करून अवैध धंद्यांना कोणत्याही प्रकारे पाठीशी न घालता त्याचा प्रतिबंध केला जाईल. तसेच तक्रारी अर्जामध्ये नमूद गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकरी आणि कर्मचाऱ्याविरोधात योग्य ती चौकशी सुरू केली आहे. चालू वर्षी अवैध धंद्यावर एकूण 240 जणांवर कारवाई करण्यात आली आहे, तर मटका जुगार संदर्भात 72 गुन्हे शहर पोलीस ठाण्यांत दाखल आहेत.
हेही वाचा - Solapur Fire : सोलापुरातील चाटी गल्लीतील जुन्या वाड्यांना आग; गॅस सिलेंडरच्या स्फोटाने गल्ली हादरली