सोलापूर - वाढील वीज बिलांचा मुद्दा चिघळत चालला आहे. शहरात वीज बिल भरू नका, या आवाहनाचे एक हजार पोस्टर रिक्षावर लावण्यात आले आहेत. हा उपक्रम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राबविण्यात येत आहे.
शहरातील एक हजार रिक्षांवर वीज बिल भरू नका, असे आवाहनात्मक पोस्टर लावण्यात आले आहेत. शनिवारी सकाळी पार्क चौक येथून जाणाऱ्या प्रत्येक रिक्षावर पोस्टर लावण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढील आठवड्यात एक लाख वीज ग्राहकांना सोबत घेत मोर्चा काढणार-
लॉकडाऊन काळात वीज महावितरणाचे कर्मचारी घरी येऊन मीटर रिडींग न घेता, सरासरी युनिट आकारणी केली आहे. ज्यामुळे अधिक लाईट बिल आहे. हे अंदाजित आकारण्यात आलेले लाईट बिल माफ करावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी पुढील आठवड्यात एक लाख वीज ग्राहकांना सोबत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. एक हजार पोस्टर रिक्षांवर लावून जनतेला वीज बिल भरू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वीज बिल माफी झालीच पाहिजे, असे आवाहन करण्यात आले आहे.