सोलापूर - मागील चार महिन्यांपासून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे परिवहन सेवा बंद आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे हाल होत असून वेतन कपातीची कुऱ्हाड पडली आहे. त्यामुळे सध्या काही एसटी ड्रायव्हर खासगी ट्रक चालवत आहेत.
सोलापूर एसटी आगारातील बस कंडक्टर सुलेमान बागवान हे सध्या कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी भाजीपाला विकत आहेत. त्यांना तीन मुलं आहेत. एसटी प्रशासनाने 25 टक्के ते 50 टक्क्यांपर्यंत वेतन कपात केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हाताला मिळेल ते करण्याची सुरुवात त्यांनी केलीय. जिल्ह्यात अनलॉक-१.० सुरू झाल्यापासून ते शेंगा विकतात. सकाळी सोलापूर मार्केट यार्डातून ते शेंगा विकत आणतात. यानंतर दिवसभर छोट्या टेम्पोतून शहरभर फिरून ते शेंगा विकतात.
एसटी महामंडळातील सोलापूर आगाराचे युनियन लीडर संतोष जोशी यांनी सांगितल्यानुसार सोलापूर आगाराच 235 कंडक्टर (वाहक)आहेत. त्यामध्ये फक्त एक कंडक्टर व ड्रायव्हर यांची ड्युटी सुरू आहे. आगाराचून सोलापूर ते बार्शी ही एकच बस सेवा चालू आहे. सुरुवातीला सोलापूर-अक्कलकोट, सोलापूर-भांडरकवठा, सोलापूर-मनदरूप या ठिकाणी बससेवा सुरू होती. मात्र आता ती देखील बंद झाली आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे एसटी डेपोतील जवळपास सर्व बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत.
'सोशल डिस्टन्स'
शासनाने दिलेल्या नियमानुसार एका सीट वर फक्त एकाच प्रवाशाला बसण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका बस मध्ये फक्त 22 प्रवासी बसतात. मात्र, वाढते डिझेलचे भाव तसेच कर्मचाऱ्यांचे पगार हे परवडणारे नाहीl. त्यामुळे एसटी बसेस बंदच ठेवण्यात आल्या आहेत. तसेच वाढत्या आजारामुळे प्रवाशांनी देखील एसटी प्रवासाकडे पाठ फिरवली आहे.