सोलापूर- पुणे जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावासामुळे उजनी धरण हे प्लसमध्ये आले आहे. यामुळे आनंदित झालेल्या करमाळा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी उजनीतील पाण्याचे जलपूजन केले आहे. तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या कोटलिंग देवस्थान येथे जलपूजन करून लवकरच धरण 100 टक्के भरू दे असे साकडे कोटलिंग देवाला यावेळी घालण्यात आले.
मागील वर्षी दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता उजनी धरणातील पाणीसाठा हा खूपच कमी झाला होता. उजनी धरण हे वजा 45 टक्क्यापर्यंत गेले होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मोठी चिंता लागली होती. त्यातच मागील चार ते पाच दिवसांपासून पुणे जिल्ह्यात तसेच भीमा नदीच्या खोऱ्यात जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे उजनी धरणात येणारे पाणी मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसातच पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे भरून उजनी धरण आज प्लसमध्ये आले आहे.
उजनी धरण प्लसमध्ये आल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकूंड, चिखलठाण सोसायटीचे चेअरमन विकास गलांडे, शिवसेनेचे जिल्हा उप प्रमुख महेश चिवटे यांनी उजनी धरणातील पाण्याचे पूजन केले. करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र कोटलिंग देवस्थान या ठिकाणी उजनी धरणात आलेल्या पाण्याचे पूजन करण्यात आले.