सोलापूर - सांगोला तालुका दुष्काळमुक्त व्हावा आणि पाऊस पडावा यासाठी पर्जन्य महायज्ञ करण्यात आला आहे. सांगोला शहरातील अंबिका देवीच्या मंदिरात ३ दिवस पावसासाठीचा हा महायज्ञ सुरू राहणार आहे.
सांगोला तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. यावर्षीही पाऊस कमी झाल्याने तालुक्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. आजही शेतीला पाणी, पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा मिळत नाही. सतत पर्जन्यमान कमी असल्याने याठिकाणी चारा छावण्या, पिण्याचे टॅकर कायम सुरू करावे लागतात. आज (शुक्रवार) तालुका दुष्काळ मुक्त व्हावा. वरुणराजाची कृपा होऊन शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे आणि बळीराजा सुखी व्हावा, यासाठी प्रधानमंत्री जनकल्याणकारी प्रचार आणि प्रसार अभियान पश्चिम महाराष्ट्रच्या भाजप अध्यक्ष राजश्रीताई नागणे-पाटील यांच्यावतीने पर्जन्यमान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले.
सांगोला येथील आंबिका देवी मदिरांमध्ये पर्जन्य महायज्ञ करण्यात आले. महायज्ञासाठी ११ चतुरस्र कुंड मांडण्यात आले होते. हे महायज्ञ ३ दिवस चालणार आहे. या यज्ञांची पूजा ११ जोडप्यांच्या हस्ते करण्यात आले. दररोज २१ यजमानांकडून पूजा करण्यात येणार आहे. या पूजेसाठी नांदेड आणि गंगाखेड येथून पुरोहितांना बोलावण्यात आले होते. महायज्ञाची पूजा १५ पुरोहितांनी केली. पहिल्या दिवशी मित्त आषाढ कृ. रोजी प्रायश्चित संकल्प, यज्ञमंडळ प्रवेश, गणपती पूजन, पुण्यासवाचन, मातृकापूजन, नांदिश्राध्द, प्रधान देवता, देवतास्थापन, ग्रहयज्ञ याचे आयोजन करण्यात आले आहे. तर, दुसऱ्या दिवशी पूजन व यज्ञ आणि तिसऱया दिवशी पूजन यज्ञ, पूर्णाहुती आणि महाआरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राजश्री नागणे यांनी दिली. या महायज्ञावेळी सांगोला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.