सोलापूर - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत कनिष्ठ लिपिक यु.आर.दळवी यांच्याकडे प्रभारी सचिवपदाचा कार्यभार दिला. त्यामुळे बाजार समितीचे संचालक तथा माजी आमदार दिलीप माने आणि शासननियुक्त संचालक श्रीमंत बंडगर यांच्यात टोकाचा वाद झाला. त्यानंतर बंडगर यांना माजी आमदार आणि संचालक दिलीप माने यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल केली.
हेही वाचा - दारू नाही तर दूध प्या, सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने व्यसनमुक्तीची शपथ
दरम्यान, कनिष्ठ लिपिक यु आर दळवी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे यांच्याकडे समितीचे प्रभारी सचिव पद का दिले, याची विचारणा बंडगर यांनी केली, तेव्हा संतप्त झालेल्या माजी आमदार दिलीप माने यांनी पुठ्ठ्याच्या पॅडने मारहाण करत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार श्रीमंत नारायण बंडगर यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
बंडगर हे पूर्वाश्रमीचे दिलीप माने यांचे कार्यकर्ते आहेत. पण, मधल्या काळात त्यांनी माने यांचे विरोधक व भाजपचे तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटात प्रवेश केला. त्यानंतर ते सहकारमंत्र्यांच्या कोट्यातून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप शासननियुक्त तज्ज्ञ संचालक म्हणून आले. माने सध्या शिवसेनेत आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर बाजार समिती संचालकांची बैठक सुरू होती, त्यावेळी सदरची घटना घडली. या प्रकरणाची जेलरोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देविदास कारंडे तपास करत आहेत.