सोलापूर - एसटी आंदोलनाची ( st employees strike ) दाहकता वाढत चालली आहे. सोलापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. अन्न त्याग करून चार दिवस झाले होते. शनिवारी (दि. 13) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आंदोलक मनोज मुदलियार यांची तब्येत ढासळू लागली. यावेळी इतर आंदोलनकांनी त्यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तत्काळ रुग्णालयात धाव घेत स्वतःच्या जीवाचे नुकसान करू नका, असे आवाहन करत आंदोलकांना ज्युस पाजले.
सोलापूर आगारातील एसटी सेवा ठप्पच
विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी सोलापुरातील सर्व एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. 8 नोव्हेंबरपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व आगार बंद करून आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याने खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांना बस स्थानकातून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अन्नत्याग मागे घेतले, परंतु आंदोलन सुरूच
सोलापूर आगारातील अनेक कर्मचाऱ्यांनी अन्नत्याग करून आंदोलन सुरू केले होते. मनोज मुदलियार यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आंदोलन सुरू होते. पण, तब्येत ढासळत असल्याने आज (शनिवार) सोलापुरातील अनेक एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
विभाग नियंत्रकांच्या आश्वासनाने अन्नत्याग उपोषण मागे
सोलापूर विभागातील दहा एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलनात सहभागी झाल्याने निलंबन केले आहे. विभाग नियंत्रक अधिकाऱ्यांनी माध्यमांना तोंडी माहिती देताना सांगितले की, दहा जणांचे निलंबन आदेश अजून सोलापूर आगारातील मुख्य अधिकाऱ्यांना प्राप्त झाले नाहीत. आम्ही सर्व एसटी कर्मचाऱ्यांची काळजी घेत आहोत, असे सांगितले.
हे ही वाचा - सोलापुरात उच्चभ्रू सोसायटीत टी-20 विश्वचषकच्या सेमिफायनल मॅचेसवर सट्टा; उच्चशिक्षित तरुणांना अटक