सोलापूर - सोलापूर शहरातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता सोलापूर शहरात 10 दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 16 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 26 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत सोलापूर शहरात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरुच राहणार असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी स्पष्ट केले.
सोलापूर शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरातील कोरोना बाधितांची संख्या ही तीन हजारांच्यावर गेली आहे. फक्त सोलापूर शहरात 3 हजार 161 कोरोना बाधित असून शुक्रवारपर्यंत 298 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता सोलापूर शहरात कडक लॉकडाऊन करण्यावर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा झाली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील जिल्हा प्रशासनावरच लॉकडाऊनचा निर्णय सोडला होता.
शनिवारी (दि. 11 जुलै) सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर शहरात 10 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनच्या काळात सोलापूर शहर पूर्णपणे कडकडीत बंद राहणार आहे. दूध, मेडीकल आणि दवाखाने वगळता इतर कोणतेही दूकान सुरू राहणार नाही. किराणा दूकान देखील या काळात बंद राहणार आहेत.
हेही वाचा - नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींचे मानधनासह विविध मागण्यांसाठी आंदोलन