सोलापूर - उपमहापौर राजेश काळे यांच्याविरोधात महापालिका कर्मचारी संघटना एकवटली आहे. गुरुवारी सकाळी मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांनी राजेश काळेंची हकालपट्टी करा, अशी मागणी करत घोषणाबाजी केली. या घोषणांनी महापालिका परिसर दणाणून गेला होता. उपमहापौर राजेश काळे यांनी सोलापूर महानगरपालिका उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ केली आहे. याबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच खंडणीचादेखील गुन्हा दाखल झाला आहे. सध्या उपमहापौर राजेश काळे फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मनपा अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरणी कर्मचाऱ्यांची वज्रमूठ
उपमहापौर राजेश काळे यांनी मनपा उपायुक्त धनराज पांडे यांना अर्वाच्य भाषा वापरली. याबाबत मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बुधवारी दिवसभर काळ्या फिती लावून काम केले. गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून महापालिकेत कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे लाक्षणिक बंद केले. उपमहापौर राजेश काळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषा वापरतात. म्हणून या कामगारांनी वज्रमूठ केली.
भाजपाकडून २४ तासांचा अल्टीमेटम; अन्यथा शिस्तभंगाची कारवाई
भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व सध्याचे उपमहापौर राजेश काळे यांना पक्षाने २४ तासांच्या आत खुलासा मागितला आहे. बेशिस्त वर्तन केल्याच्या अनेक तक्रारी पक्षाकडे आल्या आहेत. तसेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामधून पक्षाबद्दल समाजात गैरसमज निर्माण होत आहेत. उपमहापौर या पदावर असताना प्रशासनाकडून गंभीर स्वरूपचा गुन्हा दाखल होणे म्हणजे हे गंभीर आहे. याप्रकरणी पक्षाद्वारे आपणावर शिस्तभंग कारवाई का करू नये, याबाबत राजेश काळे यांनी २४ तासात खुलासा करावा. भाजपा शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी ही नोटीस काढली आहे.
एका माजी मंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी मागितले होते फिरते शौचालय
राजेश काळे हे उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. त्यामध्ये ते माजी मंत्र्यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी फिरते शौचालय मागत असल्याची माहिती समोर आली आहे. अखेर ते माजी मंत्री कोण, असा सवालदेखील निर्माण झाला आहे.
ते माजी मंत्री राजेश काळेंना वाचवतील का?
एका माजी मंत्र्याने सोलापूर शहरात 16 डिसेंम्बर रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. येथे फिरत्या शौचालयाची मागणी करण्यात आली होती. पण महापालिकेच्या वतीने या ठिकाणी शौचालय देण्यात आले नाही. या मंत्र्यांच्या कार्यक्रमात शौचालय का दिले नाही, म्हणून उपमहापौर राजेश काळे उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ करत होते. ज्या मंत्र्यासाठी किंवा विद्यमान आमदारासाठी ही शिवीगाळ केली, ते राजेश काळे यांना बीजेपीमधून हकालपट्टीच्या कारवाईपासून वाचवतील का, असा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.