सोलापूर - बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात भगतसिंह यांच्यासोबत ज्यांचा उल्लेख झाला आहे. ते कुर्बान हुसेन हेही फासावर गेलेले क्रांतिकारक होते. परंतु काही जणांनी कुर्बान हुसेन यांचे नाव काढून सुखदेव यांचे नाव समाविष्ट करावे, अशी मागणी केली आहे. याला विरोध करत सोलापूरच्या काही समाजसेवकानी कूर्बान हुसेन यांचे नाव न वगळता, सुखदेव यांच्या नावाचा नव्याने समावेश करण्यात यावा, तसेच सोलापुरातील चार हुतात्म्यांचे पाठ्यक्रम नव्याने समाविष्ट करावे, अशी मागणी सोलापुरांतील ज्येष्ठ विचारवंत आणि समाजसेवक व इतिहास तज्ञ करू लागले आहेत.
सोशल उर्दू शाळेचे मुख्याध्यापक डॉ. असिफ इक्बाल यांनी बोलताना सांगितले की, कुर्बान हुसेन यांच्या कार्याची इतिहासात नोंद व्हावी. १२ जानेवारी १९३१ ला फाशी दिलेल्या सोलापुरातील चार हुताम्यांपैकी एक कुर्बान हुसेन हे होते. या पुस्तकातून कुर्बान हुसेन यांचे नाव कमी करा, अशी मागणी होणे म्हणजे सोलापूरच्या चार हुतात्म्यांचा अवमानच असेल, अशीही भावना डॉ. असिफ यांनी व्यक्त केली आहे.
राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून बालभारतीच्या पुस्तकात चूक झाल्याचे खुलासा पत्र जाहीर करण्यात आले आहे.
बालभारतीच्या इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातील पुस्तकात क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरू यांच्यासह फासावर गेलेल्या सुखदेव यांच्याऐवजी कुर्बान हुसेन यांच्या नावाचा उल्लेख केल्यानं गोंधळ उडाला आहे.
इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमात असलेल्या पुस्तकातील एका धड्यात भगतसिंह, राजगुरु आणि कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. समाजसेवक इम्रान मंगलगिरी यांनी ईमेलद्वारे बालभारतीला विनंती केली असल्याची माहिती दिली. हुतात्मा कुर्बान हुसेन यांचे नाव न वगळता क्रांतिकारी सुखदेव यांचा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
कुर्बान हुसेन यांच्या बद्दल थोडक्यात
अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे सोलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक होते. कुर्बान हुसेन यांना इंग्रजांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून, १२ जानेवारी १९३१ ला फासावर चढविण्यात आले होते. त्यावेळी कुर्बान हुसेन यांचे वय अवघे २२ वर्षे होते. ते अविवाहित देखील होते. सोलापुरातील स्वातंत्र्यलढा दडपण्यासाठी इंग्रजांनी सोलापुरात मार्शल लॉ कायदा लागू केला होता. कुर्बान हुसेन यांनी १९२७ साली ‘गझनफर’ नावाचे उर्दू भाषेतील साप्ताहिक सुरू केले होते. ‘गझनफर’ या शब्दाचा अर्थ आहे सिंह. त्यांनी गझनफर वृत्तपत्रातून स्वातंत्र्यलढा, कामगारांचे प्रश्न, हिदु-मुस्लिम ऐक्य यासह विविध विषयांवर लेखन केले.
५ मे १९३० ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अटक झाल्यानंतर सोलापूर शहरात जी सभा झाली, त्यातील त्यांचे भाषण ऐकून सोलापुरातील तरुण कार्यकर्ते इंग्रजाविरुद्ध पेटून उठले होते. सोलापुरातील तरुण रस्त्यावर उतरल्यानंतर येथील परिस्थिती ब्रिटिश कलेक्टर यांच्या नियंत्रणाबाहेर गेली होती. त्यामुळे ९, १०, ११ मे १९३० हे तीन दिवस सोलापूर शहरात इंग्रज सरकारचे शासनच नव्हते. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी वीस वर्षाअगोदर तीन दिवस सोलापूर शहराने पूर्ण स्वातंत्र्य अनुभवले होते. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना १२ जानेवारी, १९३१ ला ब्रिटिशांनी सोलापुरातच फाशी दिली होती. तेव्हापासून या शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते.