सोलापूर - राज्यात सर्वत्र कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शहरातही आकडा हा 800च्या वर गेला आहे. अशा परिस्थितीत सोलापूर महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी पी. शिवशंकर यांनी स्वीकारली आहे. शनिवारी दुपारी त्यांनी पदभार स्वीकारला.
त्यांनी आज (शनिवारी) दुपारी साडेबारा वाजता महापालिकेचे 33वे आयुक्त म्हणून सूत्रे स्वीकारली. गेल्या महिन्यात शहरात कोरोनाबाबत काम केले आहे, त्यामुळे येथील परिस्थितीची जाणीव आहे. यापुढे कोरोना प्रतिबंधासाठी कडक उपाययोजना केल्या जातील तसेच कंटेनमेंट झोनमध्ये अधिक कडक नियम केले जातील, अशी माहिती शिवशंकर यांनी यावेळी दिली.
पदभार स्वीकारल्यानंतर पालिकेतील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी बैठक घेतली. यावेळी पालिकेचे उपायुक्त अजय पवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी, पंकज जावळे नगर अभियंता संदीप कारंजे, विजय कुमार राठोड यांच्यासह विविध खात्यातील अधिकारी उपस्थित होते.