सोलापूर - शहरातील वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत व्यापार करण्यास परवानगी दिली होती आणि शनिवार आणि रविवार असे दोन दिवस विकेंड लॉकडाऊन लागू केले होते. पण व्यापारी वर्गाकडून होत असलेला विरोध पाहून शहरातील विकेंड लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. यामुळे शहरातील व्यापारी वर्गात आनंद पहावयास मिळाला.
विकेंड लॉकडाऊनचा निर्णय मागे -
सोलापूर शहरात दोन आठवड्यापूर्वी सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी विकेंड लॉकडाऊन लागू करत शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शहरातील सर्व प्रकारचे व्यापार बंद करण्याचा आदेश पारित केला होता. सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सायंकाळी सात अशी वेळ निर्धारित केली होती. पण ऐन रंगपंचमी सणावर हे कडक निर्बंध आल्याने अनेक व्यापारी नाराजी व्यक्त करत होते. गुरुवारी विकेंड लॉकडाऊनचा निर्णय मागे घेत आता शनिवारी आणि रविवारी दुकाने आणि इतर व्यापार करण्यास परवानगी दिली आहे. पण सकाळी सात ते सायंकाळी सात ही नियमावली कायम ठेवली आहे.
गुरुवारी ग्रामीणमध्ये 352 तर शहरात 290 नवे कोरोनाचे रुग्ण तर 11 जणांचा मृत्यू
सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. गुरुवारी 290 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 188 पुरुष आणि 102 स्त्रियांचा समावेश आहे. 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात 352 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात 233 पुरुष आणि 119 स्त्रियांचा समावेश आहे. ग्रामीण भागात 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - सोलापुरातील बहुतांश शाळांकडे अग्निशमन यंत्रणेची परवानगीच नाही; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
हेही वाचा - कोरोना अहवाल निगेटिव्ह असेल तरच प्रवाशांना मिळणार सोलापुरात प्रवेश, रेल्वे अन् बसस्थानकात चाचणीची सोय