सोलापूर- सोलापूर शहरात 31 ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आलेले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात महापालिकेच्या वतीने स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जातेय. स्वच्छतेसाठी महापालिका कर्मचारी हे दोन शिफ्टमध्ये काम करत असल्याची माहिती महापालिका आयुक्त दिपक तावरे यांनी दिली आहे.
महापालिकेच्यावतीने 14 आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्रथामिक उपचार सुरु आहेत. सोलापूर शहरात सारी या आजाराचे सर्वेक्षण देखील करण्यात येत आहे. शहरामध्ये आरोग्य विभागाची पथक स्थापन करण्यात आली आहेत. या पथकामध्ये शिक्षकांना देखील घेण्यात आले आहे. पंधरा दिवसात 9 लाख पेक्षा जास्त लोकांची तपासणी करण्यात आली आहे. थंडी तापाची तपासणी करण्यात आली असून 37 रूग्ण हे संभाव्य म्हणून आढळले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती दिपक तावरे यांनी दिली आहे.
कोरोनाचा रूग्ण आढळेल्या प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या 61 सार्वजनिक शौचालयांची 24 तास स्वच्छता करण्यात येत आहे. तेथे स्वच्छतेसाठी दोन शिफ्टमध्ये कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. घरी वैयक्तीक शौचालय असलेल्या नागरिकांनी सार्वजनिक शौचालयांचा वापर करू नये, असे आवाहन तावरे यांनी केली आहे.
सोलापूर शहरात 111 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहे. आत्तापर्यंत सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या व्यतिरिक्त शहरात सारीचे ही रूग्ण आढळून येत आहेत. रूग्ण आढळून आलेल्या एकूण 31 प्रतिबंधित क्षेत्रात सध्या महापालिकेच्या वतीने निर्जंतूकीकरणासह आरोग्य तपासणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 31 प्रतिबंधित क्षेत्रात अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांकडून स्वच्छता सुरु आहे. धूराळणी आणि औषध फवारणी देखील सुरू आहे. महापालिकेने बॅटरीवर चालणारे पाठीवरील फवारणी करणारे यंत्र खरेदी केले आहे. या द्वारे सोलापूरातील या भागात फावरणी करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्रात एकूण 61 सार्वजनिक शौचालय आहेत. या ठिकाणी दररोज स्वच्छता केली जात आहे.
कोरोनाबाधित ज्या भागात आढळले आहेत तो भाग हा गरीब लोक राहत असलेला आहे. या भागातील लोक मोठ्या प्रमाणावर कामगार आहेत. कामगाराच्या वसाहती असलेल्या या बापूजी नगर, शास्त्री नगर, कुर्बान हूसेन नगर, तेलंगी पाच्छा पेठ या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या सार्वजनिक शौचालयामध्ये स्वच्छता ठेवली जात आहे.