सोलापूर - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. शहरात क्वारंटाईन होणाऱ्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. आता अशा रुग्णांपैकी काही रुग्णांना स्वखर्चाने हॉटेलमध्ये क्वारंटाईन होता येणार आहे. याबाबत आरोग्य विभागासह महापालिका प्रशासनाकडून परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका उपायुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिली.
कोरोनाबाधित विषाणूच्या संपर्कात आल्याने किंवा संशयित रुग्णांना महापालिकेकडून इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले जाते. त्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने शहरात विविध भागात त्याची व्यवस्था केली आहे. परंतु महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ज्यांची राहण्याची तयारी नसते, अशा रुग्णांना पेड सर्व्हिस उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोलापूर शहरातील तेरा ठिकाणी ही पेड क्वारंटाईन सर्व्हिस उपलब्ध करण्यात आली आहे.
परंतु ज्या व्यक्तींची स्वखर्चाने अलगीकरण किंवा विलगीकरण होण्याची इच्छा आहे, अशा रुग्णांनी व हॉटेल चालकांना दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल. हॉटलेमध्ये विलगीकरणासाठी दाखल असलेल्या रुग्णांचा तपशील सोलापूर महानगर पालिकेच्या ccsmsc2020@gmail.com या इमेल आयडी वर पाठवणे बंधनकारक असेल. हॉटले चालकाला मार्गदर्शन सूचना दर्शनी भागावर लावावे लागणार आहे.शहरातील ज्या तेरा ठिकाणी पेड क्वारंटाईन होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तेथे 750 रुपयांपासून ते 3000 रुपयांपर्यंत दर ठरवण्यात आले आहेत. रुग्णांना मोबाईल मध्ये आरोग्य सेतू अप्लिकेशन डाउनलोड करणे बंधनकारक असल्याची माहिती उपायुक्त डॉ पंकज जावळे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली.