सोलापूर- शहराच्या मध्यभागी शहर शिवसेनेच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात सायकल व बैलगाडी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचा शहरातील सुपर पेट्रोल पंपावर जात घोषणाबाजी करत समारोप करण्यात आला. शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सायकलवरून या रॅलीत सहभाग दर्शविला होता.
देशात पेट्रोल दरवाढीचा उच्चांक-
कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या तरी देखील केंद्र सरकार वेगवेगळे कर लावत आहे. त्यामुळे देशातील पेट्रोल व डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. या सायकल रॅलीत पेट्रोल भाववाढ कमी करा, अशा घोषणा देण्यात आल्या व तसे फलक लावून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
सायकल रॅली चार पुतळा ते डफरीन चौक अशी काढण्यात आली-
शिवसेना शहर संपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वाखाली ही सायकल व बैलगाडी रॅली काढण्यात आली होती. चार पुतळा चौक ते डफरिन चौक, असा रॅलीचा मार्ग होता. डफरीन चौकातील सुपर पेट्रोल पंपावर या रॅलीचा समारोप करण्यात आला. तसेच पेट्रोल पंपावर देखील केंद्र सरकार विरोधात घोषणा दिल्या.
पेट्रोल दरवाढीमुळे डोकेदुखी वाढली,त्यासाठी झंडू बाम भेट -
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या सायकल रॅलीत झंडू बाम आणले होते. केंद्र सरकारने वेगवेगळे कर लावून पेट्रोल दरवाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेची डोकेदुखी वाढली आहे. ही डोकेदुखी कमी होण्यासाठी झंडूबाम चे वाटप करण्यात आले.