सोलापूर - कोरोनाच्या वाढत्या प्रादर्भावामुळे यंदा शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या, मात्र आता 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून शहरातील शाळा सुरू केल्या जातील, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली आहे.
कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा 23 नोव्हेंबरपासून उघडण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये एक दिवसाआड अध्यापन सुरू राहणार असून, त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात सध्या 3 हजार 261 शिक्षक कार्यरत असून, सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी झाली आहे, त्यातील 30 शिक्षक कोरोनाबाधित निघाले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे, शाळा दोन शिफ्टमध्ये सुरू होतील, शिफ्ट निवडण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना असेल, एका वर्गात 20 विद्यार्थी असतील, शाळा सकाळी 7.30 ते 11.30 व दुपारी 1.30 ते 5.30 या वेळेत भरणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.
खबरदारी घेत शाळा सुरू होणार
शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन, शाळा महाविद्यालय सुरू करण्याचे निर्देश राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दितील सर्व मनपा व खासगी शाळा आणि महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्याचेही ते म्हणाले. सोमवारपासून शहर परिसरातील शाळा महाविद्यालय सुरू करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येतील, त्यानंतर आवश्यकतेनुसार बाकीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश शिक्षण विभागास देण्यात आले आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करने, थर्मामीटर ऑक्सिमीटरच्या साह्याने प्रत्येक विद्यार्थ्यांची चाचणी करून घेणे, प्रत्येक वर्ग सॅनिटाझ करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली आहे.