सोलापूर - शहरामधील बहुतांश सलून दुकान, ब्युटीपार्लर, स्पा सेंटर या व्यवसायांना सरकारने परवानगी दिली आहे. तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर शहरवासीयांच्या केसांवर कात्री चालू लागली आहे. नियम व अटींवर परवानगी देण्यात आली आहे. पण दाढी, फेस मसाज या कामानां परवानगी नाकारण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून कटिंग दुकान, स्पा सेन्टर ,ब्युटीपार्लर बंद झाले होते. कटिंग दुकान, ब्युटीपार्लरमधून संसर्ग वाढू शकेल यामुळे सरकारने या उद्योगास परवानगी नाकारली होती. देशामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण सलून दुकाने मात्र लॉकडाऊनमध्येच होते. या निर्णयामुळे सलून दुकाने अनलॉक प्रक्रियेत आले आहेत.
या उद्योगांना परवानगी देण्यात यावी यासाठी नाभिक समाज संघटना दिवसेंदिवस आक्रमक होत चालली होती. अखेर दाढी, फेस मसाज या प्रक्रियेला मान्यता नाकारण्यात आली असून केश कर्तन, कट या कामांना परवानगी देण्यात आली आहे. कारण दाढी, फेस मसाजमुळे कोरोना संसर्ग वाढू शकतो. तसेच या व्यवसायात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण सुरक्षितते मध्ये राहून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नाभिक समाज संघटनेकडून भाववाढ देखील करण्यात आल्याची माहिती यावेळी हेअर अफैरच्या मालकांनी सांगितली. तब्बल तीन महिन्यानंतर रविवारी पहिला दिवस होता. सलून दुकान मालकांनी व कर्मचाऱ्यांनी पी.पी. ई. किट परिधान करून काम सुरू केले होते. त्याचबरोबर कटिंग झाल्यावर खुर्च्या निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. डीसपोजेबल टॉवेल, डीसपोजेबल नॅपकिन वापरण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती दिली.