सोलापूर - शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसवर आरटीओे विभागाने कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी सांगितले आहे. या कारवाईत 10 स्कूल बस पकडण्यात आल्या असून 527 बस मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
आरटीओ विभागाने स्कूल बस परवान्याचे नुतनीकरण न केलेल्या 10 स्कूलबसवर कारवाई केली आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्या नेतृत्वाखाली मोटर वाहन निरिक्षक अजय ताम्हणकर, संतोष डुकरे, सुहास ठोंबरे, नानासाहेब शिंदे यांच्या पथकाने स्कूल बसची तपासणी केली. यावेळी नुतनीकरण न केलेल्या स्कूलबसवर ही कारवाई करण्यात आली आहे.
स्कूल बस नियमावली 2010 नुसार प्रत्येक वर्षी स्कूलबसची तपासणी आणि नुतनीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोलापूर आरटीओ कार्यालयाकडे एकूण 796 स्कूल बसची नोंदणी आहे. यातील फक्त 269 स्कूल बस मालकांनी तपासणी करून नुतनीकरण करून घेतले आहे. उर्वरित 527 बस चालक हे तपासणी न करता विद्यार्थ्यांची वाहतूक करत आहेत. तपासणी करून घेण्यासाठी मुदत देण्यात आलेली असताना देखील तपासणी करून न घेता विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यामुळे 527 बसमालकांना परवाना निलंबित करण्याची नोटीस देण्यात आली आहे.