सोलापूर - सध्या संपूर्ण जगावर असलेले कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि या आजारात असलेल्यांना बरे होऊ दे, अशी प्रार्थना अल्लाहकडे केल्याची माहिती सोलापूरचे शहर काझी सय्यद अमजद अली यांनी दिली आहे. ईद सण साजरा करताना सर्व घरी राहूनच हा सण साजरा करत आहेत. शारीरिक अंतर ठेवत हस्तांदोलन व गळाभेट न घेता एकमेकांना शुभेच्छा देण्याचे आवाहनही शहर काझी यांनी केले आहे.
यावर्षीचा ईदचा सण हा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणारी ईद यावर्षी कोरोनाच्या प्रभावामुळे घरात राहूनच साजरी केली जात आहे. मुस्लीम बांधवांनी एकत्रित येऊन नमाज पठण न करता घरात राहुनच नमाज अदा केली. ईदच्या दिवशी गळाभेटीला खूप महत्व असते. गळाभेट घेऊन ईदला शुभेच्छा दिल्या जातात. मात्र यावर्षी गळाभेट न घेता, तसेच व्यक्तीगत न भेटता, सोशल मीडियावरून, फोन करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.