सोलापूर - जिल्हाधिकारी कार्यालयातील मुन्याप्पा सिद्राम बिराजदार या कर्मचाऱ्यास सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मारहाण केल्या प्रकरणी महसूल कर्मचाऱ्यांनी बुधवारी दिवसभर काम बंद आंदोलन करून निषेध व्यक्त केला. तसेच मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. बुधवारी दिवसभर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात तणावपूर्ण वातावरण होते.
मंगळवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात नाट्यमय घडामोडी घडल्या. इब्राहिम मुलाणी या व्यक्तीने सावकारी जाचास कंटाळून आंदोलन केले होते. या आंदोलनाला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मुन्याप्पा सिद्राम बज्जर याला प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करून रोखले होते. जिल्हा उपनिंबधक अधिकारी कुंदन भोळे यांनी आश्वासन देत शोले स्टाईल आंदोलनकर्त्याला दिलासा दिला होता. पण मारहाणीत जखमी झालेल्या मुन्याप्पा बज्जर याने मंगळवारी रात्री सदर बझार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
बुधवरी दिवसभर महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद करून मारहाणीचा निषेध व्यक्त केला. सायंकाळी एकत्र जमून निषेध व्यक्त केला. मारहाण करणाऱ्या संशयित आरोपींवर कठोर शासन झाले पाहिजे, अशी मागणी करत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.