सोलापूर - कॉलसेंटर मध्ये नोकरी आहे, अशी जाहिरात देऊन शेकडो तरुणांना आकर्षित करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार सोलापुरात समोर आला आहे. यामध्ये कॉल सेंटरसाठी नोकरीस आलेल्या तरुण-तरुणींकडून सुरुवातीला कामावर घेण्यासाठी १७०० रुपये प्रतिव्यक्ती घेतले. त्यानतंर तीन ते चार महिने काम करवून घेतले आणि मोबदला न देता, कॉल सेंटर मालकाने कंपनीला टाळे ठोकून पोबारा केला आहे. शेकडो तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात कैलास भारत कसबे याविरोधात 16 डिसेंबरला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
उच्च शिक्षित तरुणांची फसवणूक-
स्थानिक दैनिकात कॉल सेंटरमध्ये नोकर भरती असल्याची जाहिरात ऑगस्ट 2020 मध्ये प्रकाशित झाली होती. याबाबत सिव्हील डिप्लोमा, कॉम्प्युटर डिप्लोमा, पदवीधर अशी पात्रता असणाऱ्यांनी अर्ज करावे असे प्रकाशित झाले होते. त्यामुळे ऑगस्ट 2020 मध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी अर्ज करून मुलाखती दिल्या. यामध्ये अनेकांना नोकरीस पात्र असल्याचे तोंडीच सांगून कामावर रुजू होण्यास सांगितले. त्यानंतर होटगी रोड येथील इंडस्ट्रीयल येथे बोधी लाईफ नावाचे कॉल सेंटर सुरू करण्यात आले होते. कॉल सेंटर सुरू करत सुरुवातीला किरकोळ कामे करवून घेतली.
प्रत्येकी 1700 रुपये आकारले-
सोलापूर शहरातील शेकडो स्थानिक तरुणांनी येथील नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर ज्यांना नोकरीस पात्र असल्याचे सांगितले अशा सर्वच तरुणांकडून प्रत्येकी 1700 रुपये रक्कम जमा करण्यास सांगितले. त्यामध्ये गणवेश आणि अकाउंट किट येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतू 1700 रुपये घेऊन काहीच दिले नाही. उलट या तरुणांची दिशाभूल करून त्यांकडून थोड्या फार प्रमाणात काम करवून घेतले आणि अचानक कॉल सेंटरच्या इमारतीला टाळे ठोकून आरोपीने पोबारा केला.
विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-
कॉल सेंटरला अचानक टाळे ठोकल्यानंतर या तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर या सर्व तरुणांनी कॉल सेंटर चालक कैलास कसबे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
दिवसभर ताटकळत थांबून फसवणूक झालेली तरुण रिकाम्या हाती परतले-
होटगी रोड येथील इंडस्ट्रीयल येथे बोधी लाईफ नावाचे कॉल सेंटर सुरू करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर कॉल सेंटर चालकाला तरुणांनी पैशाची मागणी करत तगादा लावला होता. त्यामुळे कॉल सेंटर चालक कैलास कसबे याने सर्वांनी शुक्रवारी 25 डिसेंबरला या, असे आवाहन केले होते. फसवणूक झालेले शेकडो तरुण होटगी रोड येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या कॉल सेंटर इमारतीच्या आवारात दिवसभर थांबले. परंतु या तरूणांच्या रकमा देण्यासाठी कोणीही आले नाही. शेवटी त्यांनी शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास पुन्हा औद्योगिक पोलीस चौकीत तक्रार केली. परंतु या अगोदरच गुन्हा दाखल असल्याने आणखीन तोच गुन्हा दाखल झाला नाही. अखेर या तरुणांना रिकाम्या हाती घरी परत जावे लागले.