सोलापूर - प्रहार जनशक्ती संघटनेच्या (Prahar Janshakti Sanghatana) कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनात काळ्या शाईने लिहून ड्रेनेज अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सोलापूर पालिका प्रशासनाने ड्रेनेजमध्ये मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत निधीची घोषणा केली होती. मात्र, सरकारी काम सहा महिने थांब अशी अवस्था नातेवाईकांची झाली आहे. 10 लाख रुपयांसाठी मृतांचे नातेवाईक सोलापूर महानगरपालिकेत हेलपाटे मारत आहेत. ही बाब प्रहार जनशक्तीला कळताच त्यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात येऊन काळ्या शाईने लिहून श्रद्धांजली अर्पण आंदोलन केले.
23 डिसेंबर 2021 रोजी ड्रेनेजमध्ये पडून चौघांचा मृत्यू झाला होता-
सोलापूर अक्कलकोट महामार्गावर ड्रेनेजचे कामकाज सुरू होते. ठेकेदाराकडे काम करणारे चौघे यामध्ये पडून गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेच्या दुसऱ्या दिवशी प्रहार जनहित शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत, मृतांच्या वारसांना सोलापूर महानगरपालिका मदतनिधी देत नाहीत तोपर्यंत मृतदेह पोस्टमार्टमसाठी येथून हलवू देणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर, महापौर कांचना यंनंम यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येऊन प्रत्येकी 10 लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांना मदतनिधी घोषित केला होता. मृतांमध्ये जत(सांगली) येथील आणि तिघे परप्रांतीय होते.
परप्रांतीय मजुरांच्या नातेवाईकांचे उत्तर प्रदेशातून हेलपाटे-
तीन जणांपैकी मृताच्या एका वारसास 10 लाख रुपयांचा मदतनिधी आजतागायत मिळाला नाही. थेट उत्तर प्रदेश येथून त्याचे नातेवाईक सोलापुरात आले आहेत. मात्र, लालफीत शाहीच्या कारभारात त्यांचे मदतनिधी अडकून पडले. गेल्या आठ दिवसांपासून सोलापूर महानगरपालिकेत हेलपाटे मारू लागले आहेत.
पालिका आयुक्तांच्या दालनात श्रद्धांजली आंदोलन-
प्रहार जनशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ड्रेनेज मध्ये मृत झालेल्या वारसास घेऊन पालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या दालनात आले. पालिका प्रशासनाचा विरोध करत त्यांच्या दालना समोर काळ्या शाईने लिहून निषेध केला आणि श्रद्धांजली अर्पण केली.