सोलापूर - शहरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर इतर आरोपींचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.
सोलापूर -विजापूर रोडवरील एका मंदिराजवळ एक अल्पवयीन मुलगी रडत बसली होती. त्यावरून शहरातील एका नागरिकाने जवळ असलेल्या पोलीस ठाण्याला फोन करून ही माहिती दिली. पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन मुलीस विश्वासात घेतले आणि रडण्याबाबत विचारणा केली. तेव्हा तिने बलात्कार झाला असल्याची माहिती पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तिला आधार देत विश्वासात घेऊन आणखी विचारणा केली असता तिने घडलेली हकीकत पोलिसांना दिली आणि मती गुंग करेल अशी घटना उघडकीला आली.
सुरुवातीला एका तरुणाबरोबर या पीडित मुलीचे प्रेमसंबंध होते. त्या तरुणाचे इतर सर्व आरोपी मित्र असल्याचे समोर आले आहे. मुलीस वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. कधी गाडी मध्ये, कधी लॉजमध्ये, कधी शेतामध्ये आदी ठिकाणी नेऊन बलात्कार करण्यात आलेला आहे. एका दिवशी तर चौघांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला असल्याचे समोर आले आहे. पीडित मुलगी ज्या शाळेत जाते त्या मार्गावर हे संशयित आरोपी प्रवासी वाहतूक करणारे रिक्षाचालक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत पीडित मुलीच्या तक्रारीनुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती टिपरे या करीत आहेत.
मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारीला विजापूर नाका पोलीस ठाणे येथे आयपीसी 376, त्याचप्रमाणे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यापैकी पाच आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. दीड महिन्यापर्यंतपासून हा सर्व प्रकार सुरू होता.