सोलापूर - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविल्या जात आहेत. त्याअनुषंगाने राज्यातील विविध शाळा गेल्या दोन वर्षांपूर्वी बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्या आजतागायत बंदच आहेत. मंगळवारी (दि. 15 जून) सोलापुरात नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात झाली. मोठ्या उत्साहात हा दिवस शहरातील विविध शाळांमध्ये साजरा करण्यात आला. सिद्धेश्वर प्रशालेत सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांच्या अनुपस्थित शिक्षकांचीच शाळा भरल्याचे बोलकेदृष्य पहावयास मिळाले. शाळेच्या दर्शनी भागात छानशी रांगोळी रेखाटण्यात आली होती. सुदंर हस्ताक्षरात फलकलेखन करण्यात आले होते. जरी शाळा बंद असली तरी शाळा सुरू झाल्याचा अनुभव यावेळी आला.
विद्यार्थ्यांनाविना शाळेत प्रतिज्ञा
प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी उपस्थित शिक्षकांना एका रांगेत उभे करून ऑनलाइन शिक्षण पद्धतीबाबतच्या योग्य त्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांविनाच शिक्षकांना रांगेत उभे करून प्रतिज्ञा देण्यात आल्याने यावेळी वेगळीच अनुभूती अनुभवण्यास आली. मोजक्या शिक्षकांच्या उपस्थितीत गणेश मुर्तीची पूजा करण्यात आली. दरम्यान, ऑनलाइन शिक्षणपद्धती मंगळवारपासून (दि. 15 जून) सुरू झाली आहे. याबाबत प्रशालेने योग्य ते नियोजन केले होते. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अध्ययन-अध्यापन सुरू करावयाचे आहे, अशी माहिती मुख्याध्यापक पाटील यांनी यावेळी दिली.
शाळेतील तासाप्रमाणे ऑनलाइन वर्ग
शाळेच्या वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गात जाऊन वेळापत्रकानुसार तासिका घेतले. मोबाईल स्टॅन्डच्या साहायाने मोबाईलद्वारे लाईव्ह शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले. सर्वप्रथम आपला परिचय करून देऊन त्यानंतर विषयाची माहिती यावेळी शिक्षकांनी दिली. यावेळी सारा परिसर शैक्षणिक वातावरणात न्हाऊन गेल्याचे दृश्य पहावयास मिळाले.
हेही वाचा - सोलापूर : हद्दवाढ भागातील मिळकतदारांना मिळणार 'प्रॉपर्टी कार्ड'