सोलापूर - सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवारांच्या समर्थनार्थ सोलापुरातील चार हुतात्मा चौक येथे निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. अजित पवार व शरद पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे. याचा निषेध करत राज्यभर राष्ट्रवादी काँगेस पक्षाकडून संताप व्यक्त केला जात आहे.
राजकीय द्वेषापोटी छापेमारी
ईडी आणि आयकर विभाग हे देशातील स्वायत्त संस्था आहेत. काम करण्यासाठी ईडी (सक्तवसुली संचालनालय) आणि आयकर विभागाला काही अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, या संस्थांचा दुरुपयोग करून केंद्र सरकार राजकीय द्वेषापोटी पवार कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे.
स्वतःला शिस्तप्रिय समजणाऱ्या भाजपचे असे कारस्थान - महेश कोठे
स्वतःला शिस्तप्रिय पक्ष म्हणून जनते समोर सांगणाऱ्या भाजपने राज्यभरात ईडीमार्फत कारवाई सुरू केली आहे. राजकीय द्वेषापोटी विरोधकांवर केंद्र सरकार ईडी किंवा आयकर विभागामार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असा आरोप नगरसेवक महेश कोठे यांनी केला आहे. तसेच भाजपमुळे देशातील महागाई वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. भाजप ईडी किंवा आयकर विभागामार्फत सूडबुद्धीने कारवाया करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही. यापूढे आता रस्त्यावर आणि तीव्र स्वरूपात आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली आहे.
हेही वाचा - हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर ही शिवसेनेची भूमिका - सदाभाऊ खोत