सोलापूर - ना उमेदवार...ना प्रचार फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा समाचार अशाप्रकारचे वर्णन मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांचे करावे लागेल. निवडणूक प्रक्रियेतल्या या नव्या प्रयोगामुळं जितकी डोकेदुखी भाजपची वाढली आहे, त्यापेक्षा जास्त निवडणूक आयोगाची यामुळे कोंडी झाली आहे. कारण, राज ठाकरे कुणाला मत द्या हे सांगत नाहीत किंवा त्यांचा उमेदवारही नाही. मग त्यांच्या या भव्य सभांचा खर्च कुठल्या उमेदवाराच्या नावावर टाकायचा हा प्रश्न निवडणूक आयोगासमोर निर्माण झाला आहे.
पाडव्याच्या सभेत बोलताना राज यांनी राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाला सहमती दर्शवली होती. त्यामुळे भाजप नेत्यांकडून राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च काँग्रेसच्या माथी मारण्यासाठी आटापिटा सुरू आहे. राज यांच्या सभेची पत्रकार परिषद घेणाऱ्या मनसे संघटक दिलीप धोत्रे यांनीही माहिती देताना स्वखर्चाचा दावा केला आहे. त्यामुळे राज यांच्या सभांच्या खर्चाचे काय, असा प्रश्न कायम आहे. मात्र, निवडणूक आयोग काय भूमिका घेते हे लवकरच स्पष्ट होईल.
नांदेडनंतर आता राज ठाकरेंची १५ एप्रिलला सोलापुरात सभा होत आहे. कर्णिकनगर येथील मैदानावर ही सभा होणार आहे. मोदी आणि शहा यांना टीकेचे लक्ष्य करणाऱ्या राज यांच्या सभेची सोलापुरात जोरदार चर्चा आहे. राज ठाकरे नेमके काय बोलणार याची उत्सुकता सोलापूरकरांना आहे.