सोलापूर-महावितरण कार्यालयात कार्यरत असणाऱ्या वरीष्ठ तंत्रज्ञाचा अपघाती मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विडी घरकुल परिसरातील सागर चौक येथे ही घटना घडली. लाईन चालू करण्यासाठी सचिन प्रकाश इंगळे(वय 40 वर्ष रा रविवार पेठ,सोलापूर) हे विद्युक वाहिनीच्या खांबावर चढले होते. त्यावेळी ते तोल जाऊन ते खाली पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेस महावितरणाला जबाबदार धरत मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत गोंधळ घालायला सुरुवात केली.
अपंग असताना खांबावर चढण्याचा आदेश कुणी दिला-
सचिन इंगळे यांना गेल्या वर्षी अपघाती अपंगत्व आले होते. म्हणून त्यांची नियुक्त बाळे येथील सबडिव्हिजन मध्ये करण्यात आली होती. पाठीत रॉड असल्याने त्यांना हलकेच काम लावले जात असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी आणि कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली. पण गुरुवारी सायंकाळी विडी घरकुल येथील सागर चौकातील विद्युत वाहिनीच्या खांबावर सचिन इंगळे यांना कोणी चढण्याचा सल्ला किंवा आदेश दिला? हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे याची अधिक चौकशी केली जाणार असल्याची माहिती महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली
मूळ नियुक्ती ग्रामीण भागात-
सचिन इंगळे यांची मूळ नियुक्ती सोलापूर ग्रामीण भागात आहे. पण सागर चौकात शहर आणि ग्रामीण दोन लाईन जोडलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण विभागातील लाईनमनला देखील या ठिकाणी काम करावे लागते, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नातेवाईकांचा महावितरण अधिकाऱ्यांविरोधात संताप-
वरिष्ठ तंत्रज्ञ सचिन इंगळे हे खांबावरून पडताच त्या ठिकाणी लवकर मदत मिळाली नाही, असा आरोप इंगळे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्याचबरोबर सचिन हा अपंग असताना खांबावर चढण्याचा आदेश कुणी दिला, त्याची चौकशी करून त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी मृताचे नातेवाईक करत होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सचिनला ड्युटी करत असताना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास दिला असल्याचाही आरोप नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.