सोलापूर - मागील सरकारच्या काळातील पाच वर्षात वीज महावितरण आर्थिक अडचणीत आल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोलापुरात दिली. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारार्थ जयंत पाटील सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी युती सरकारवर आरोप करत निशाणा साधला. यावेळी मंत्री उदय सामंत, सतेज पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, उमेश पाटील आदी नेते उपस्थित होते.
सध्या राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते प्रचार दौऱ्यावर आहेत. रविवारी होटगी रोड येथील हेरिटेज मंगल कार्यालय किंवा हेरिटेज लॉन येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठक घेतली. महाविकास आघाडीकडून अरुण लाड व जयंत आसगवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यांच्या प्रचारासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, अतिशय गोंधळात हा कार्यक्रम पार पडला आहे.
मागील सरकारमुळे वीज महावितरण आर्थिक अडचणीत-
सद्यस्थितीत राज्यात वीज बिल माफीसाठी विविध ठिकाणी विविध पक्षाच्या वतीने आंदोलने होत आहेत. त्यावर जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मागील सरकारमुळे पाच वर्षांच्या काळात वीज महावितरण विभाग आर्थिक अडचणीत सापडले आहे. आम्ही बैठका घेऊन वीज ग्राहक आणि वीज महावितरण यातील मधला मार्ग काढण्याच्या प्रयत्न करत आहोत.
महावितरची 76 हजार कोटींची थकबाकी-
मागील सरकारमुळे राज्याच्या वीज महावितरण विभागावर 76 हजार कोटींची थकबाकीचा बोझा निर्माण झाला आहे. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ होतील की, नाही हे मंत्रिमंडळच्या बैठकीत ठरवले जाईल, अशी माहिती ही यावेळी जयंत पाटील यांनी दिली आहे.
वीज बिलावरून सोलापुरात मनसेचा मोर्चा-
वीज बिल सवलती किंवा माफीसाठी राज्यात सध्या विरोधी पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील वीज बिल प्रश्नी राज्यपाल कोश्यारी आणि शरद पवार यांची भेट घेतली होती. तसेच आज आम आदमी पक्षाच्या वतीने बारामतीत शरद पवार यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला होता. तर लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिले माफ करावी या मागणीसाठी बुधवारी 25 नोव्हेंबरला सोलापुरात मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.