सोलापूर - न्यायालयाच्या आदेशानुसार मुस्लिमांना आरक्षण (Muslim Reservation) मिळावे, या मागणीसाठी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या वतीने 11 डिसेंबर 2021 रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठा समाजापेक्षा मुस्लिम समाज आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टया मागासलेला आहे तरीही मुस्लिम समाजाला आरक्षण मिळत नाही ही अत्यंत खेददायक असल्याचे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांनी म्हटले. कोर्टाने देखील आरक्षण देण्याचा आदेश दिला होता, अशी माहिती यावेळी देण्यात आली. एमआयएम पक्षाच्या मेळाव्यानंतर सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात एमआयएम पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सोलापुरातील एमआयएम नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोलापुरातील अनेक मोक्याच्या ठिकाणी वक्फ बोर्डाच्या जमिनी आहेत. या जागांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहेत किंवा त्या ठिकाणी मोठ मोठी कॉम्प्लेक्स बांधण्यात आली आहेत. त्या जागांचा शोध घेऊन वक्फ बोर्डाच्या जागा परत वक्फ बोर्डाला मिळाव्यात, यासाठी न्यायालयीन लढा लढणार असल्याची माहिती यावेळी खा. इम्तियाज जलील यांनी दिली. ज्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी हडपल्या आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे पत्रकार परिषदेत दोन्ही खासदारांनी माहिती सांगितली.
मुस्लिम आरक्षणासाठी हजारोंच्या संख्येने मुंबईत मोर्चा काढणार -
सध्या महाराष्ट्रात वेगवेगळे समाज आरक्षणासाठी लढत आहेत. त्यामध्ये धनगर समाज, मराठा समाज पुढे आहेत. पण या समाजापेक्षा मुस्लीम समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. कोर्टाने देखील मुस्लिमांना आरक्षण (Muslim Reservation ) द्या असा आदेश दिला होता. हा आदेश आजही प्रलंबित आहे. आम्ही दुसऱ्या कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला विरोध करत नाही, तर मुस्लिम समाजाला आरक्षण दिले पाहिजे. त्यांचा हक्क आहे, असे सांगितले. त्यासाठी सर्व मुस्लिम समाजाच्या तरुणांना घेऊन मुंबईत राज्य सरकार समोर आरक्षणाचा मुद्दा मांडणार असल्याची माहिती खा.इम्तियाज जलील आणि खा. असदुद्दीन ओवैसी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत एमआयएम पक्षाचे शहर अध्यक्ष फारूक शाब्दी, नगरसेवक अजहर हुंडेकरी, रियाज खरादी, वहिदा भंडाले, गाजी जहागरिदार, पलेखान पठाण, अन्वर सदाद आदी उपस्थित होते.