सोलापूर- घरगुती वीज बिलामध्ये राज्य सरकारने 50 टक्के सवलत द्यावी, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना टाळेबंदीच्या काळातील 4 महिन्यांचे वीज बिल भरणे अशक्य असल्याचे आमदार शिंदे यांनी म्हटले आहे.
संपूर्ण जगभरात कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने मोठया प्रमाणात जीवितहानी होत आहे. त्यामुळे सरकारने विषाणुचा प्रसार होऊ नये, यासाठी संपूर्ण राज्यात 3 महिने टाळेबंदी लागू केली होती. शहरात मोठया प्रमाणावर विडी कामगार, यंत्रमाग कामगार, बांधकाम कामगार व इतर कामगार आहेत. त्यांचा रोजगारावर उदरनिर्वाह आहे. परंतु गेली तीन महिने टाळेबंदी असल्याने त्यांचा रोजगार बंद आहे. त्यामुळे मजुरांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून 4 महिन्यांचे सरासरी बिल वाढीव दराने आलेले आहे. आर्थिक बिक स्थिती असल्याने नागरिकांना वाढीव वीज बिल भरणे अशक्य असल्याचे आमदार शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, वीज बिल वाढीव आल्याच्या राज्यभरातील नागरिकांनी सरकारकडे तक्रारी केल्या आहेत.