सोलापूर - महाराष्ट्र राज्याने राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण गेल्या दोन वर्षांपासून शाळेत न गेलेल्या विद्यार्थ्यांना शाळेची आवड कायम राहावी किंवा शिक्षणाची गोडी सदैव राहावी यासाठी शिक्षक विशेष प्रयत्न करत असताना दिसत आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शाळांना देखील कुलुप लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचा किलबिलाट दोन वर्षांपासून बंद झाला होता. आजतागायत शिक्षणाचे ऑनलाइन धडे दिले जात आहेत. आता पुढील महिन्यात शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थी शाळेत जातील का? असा पेच निर्माण झालेला आहे. यासाठी शिक्षक वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. सोलापुरातील एका झोपडपट्टीच्या वस्तीमध्ये महानगरपालिकेच्या शिक्षकांनी मशिदींमध्ये शाळा सुरू केली आहे. मशिदींमध्ये शाळेचे वर्ग सोशल डिस्टन्स ठेवून भरवले जात आहेत. धार्मिक स्थळांचा उपयोग शिक्षणासाठी होत असल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थी फक्त वर्ग बदलतील आणि शिकण्याची आवड कायम राहील असा यामागील उद्देश असल्याची माहिती शिक्षकांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
शिक्षणाची गोडी कायम राहावी -
राज्यातील शाळा पुढील महिन्याचा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. पण गेल्या दोन वर्षांपासून शाळेत न गेलेल्या विद्यार्थ्यांना आता शाळा म्हणजे नवलच वाटणार आहे. ही चिमुकले विद्यार्थी शाळेच्या वर्गात न बसण्यासाठी पुन्हा आपल्या पालकांसमोर हट्ट करणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळा नवल वाटू नये म्हणून सोलापुरातील महानगरपालिकेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी वेगवेगळ्या नगरांमधील मशिदीमध्ये वर्ग सुरू केले आहेत. टप्प्याटप्प्याने मोजके विद्यार्थी बोलावून त्यांच्या मनात शाळेची गोडी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या शिक्षक फजल शेख व मुख्याध्यापक मुद्दसर पीरजादे यांनी हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. गोरगरीब घरातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन, लॅपटॉप असे उपकरण नाहीत. त्यांना ऑनलाईन शिक्षण कसे द्यावयाचे असा प्रश्न पडला होता. तसेच शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात एक मोठी दुरी निर्माण झाली होती. ही दुरी कमी करण्यासाठी मशिदींमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. नई जिंदगी म्हणून सोलापुरातील मोठी मुस्लिम वस्ती आहे. या भागात हातावर पोट असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यांच्या मुलांसाठी मशिदींमध्ये शाळा सुरू केल्या आहेत. धार्मिक स्थळे तर गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहेत, शिक्षणासाठी त्याचा उपयोग होत असल्याने मस्जिद ए अक्साच्या विश्वस्तांनी ताबडतोब मस्जिद शिक्षकांच्या ताब्यात दिली.
घर तिथे फळा व खडू -
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात काम करणाऱ्या फजल शेख या शिक्षकाने घर तिथे फळा व खडू ही आणखीन एक संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. घरोघरी फळा व खडू घेऊन जाऊन गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावा, असा यामागील उद्देश असल्याची माहिती शिक्षकांनी दिली.
वेतन थकले होते, परंतु आता सुरुळीत झाले -
मार्च 2020 पासून सोलापूरसह राज्यातील शाळा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. अनेक खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षणावर अधिक भर दिला. मार्च 2020 पासून सोलापूर महानगरपालिकेच्या शिक्षकांना विनावेतनवर देखील काम करावे लागले. पण आता मात्र सुरुळीत वेतन मिळत असल्याची माहिती यावेळी शिक्षकांनी दिली.
हेही वाचा - Live Video: कीर्तनकार ताजुद्दीन बाबा यांचे किर्तन सुरु असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन