सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषद आवारात सोमवारी सायंकाळी अक्कलकोट तालुक्यातील म्हानतेश कट्टीमणी यांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हानतेश कट्टीमणी हे अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील जिल्हा परिषदेच्या कन्नड शाळेत मुख्याध्यापक आहेत. शिक्षणाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून व तसेच त्यांची बदली केल्याच्या निषेधार्थ त्यांनी हे कृत्य केल्याचे म्हटले आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ताबडतोब मुख्याध्यापक कट्टीमणी यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
- मुख्याध्यापकाच्या विविध चौकशा आणि बदली-
म्हानतेश हणमंतराव कट्टीमणी(वय 54,रा अक्कलकोट) यांच्या विरोधात जिल्हा परिषद विभागाने अनेक चौकशा लावल्या आहेत. तसेच तडवळ या ठिकाणी बदली केली आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी विविध युक्त्या लढवत उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. विविध उपक्रम राबवित असताना आपल्या विरोधात तक्रारी करून विभागीय स्तरावर चौकशी लावण्यात आली. या चौकशीमधून कोणताही ठपका आपल्यावर ठेवण्यात आला नाही. तरी देखील 54 किमी दूर तडवळ येथे बदली करण्यात आली आहे.
- शिक्षण अधिकाऱ्यांकडून त्रास आणि स्वीय सहायकाने पैशाची मागणी केली-
जिल्हा परिषदेच्या कन्नड शाळेत मुख्याध्यापक म्हणून उत्तमरित्या काम करताना अन्यायकारक बदली करण्यात आली. ही बदली रद्द करण्यासाठी जिल्हा परिषद विभागातील एका स्वीय सहायकाने एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली. शिक्षण अधिकारी यांच्याकडून देखील त्रास होत असल्याचा आरोप आत्मदहन करणाऱ्या मुख्याध्यापकाने केला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मुख्याध्यापक कट्टीमणी यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करू, असे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा - केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंची वर्णी लागण्याची शक्यता, ज्योतिरादित्य सिंधिया यांनाही दिल्लीला बोलावले